अद्ययावत सेवेसाठी नेटवर्क सक्षमीकरण सुरू
नागपूर : सोमवारी सकाळपासून शहरात मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नेटवर्क सक्षमीकरणाचे काम सुरू असल्याने काही काळ सेवा प्रभावित झाली होती. याचा मोठा मन:स्ताप ग्राहकांना सहन करावा लागला. सकाळच्या वेळी तब्बल तीन तास मोबाइल सेवा खंडित झाल्याने कॉल ड्रॉपच्या समस्येला ग्राहकांना सामोरे जावे लागले. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार असल्याने कॉल ड्रॉपचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
नागपुरात मोबाइल सेवा देणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांचे नेटवर्क सक्षमीकरणाचे काम सध्या सुरू आहे.त्यामुळे सव्र्हरमध्ये काही बदल करण्यात येत आहेत. त्याशिवाय अनेकांच्या सेवेमध्ये कॉल ड्रापची समस्या येऊ नये, यासाठी मोबाइल टॉवर्समध्येही बदल करण्यात येत आहे. मोबाइलवर बोलताना आवाजाचा अडथळा अनेकदा येत असतो. त्यामुळे फ्रिक्वेन्सीमध्येही सुधारणा करण्याचे काम जोरात सरू आहे. याशिवाय ग्राहकांची इंटरनेट वापराची गरज बघता त्याचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जात आहेत. शहराच्या काही भागात मोबाइलची सेवा नसल्याने तेथे टॉवर उभारले जात येत आहेत. जुन्या टॉवरचे अॅन्टीने देखील बदण्यात येत आहेत. त्यामुळे आज सोमवारी सकाळी तीन तास मोबाइल सेवा खंडित होती. यामध्ये आयडियाच्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. भविष्यात फाइव्ह जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्या आपले यंत्र सज्ज करण्याच्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी अशाच प्रकारे सेवा काही काळ खंडित राहील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.