साडी बघताच मुलींच्या डोळय़ात पाणी; आईच्या मायेची उणीव भरून निघाल्याची भावना
अनिल कांबळे
श्रद्धानंदपेठेतील अनाथालयात लहानाच्या मोठय़ा झालेल्या पाच मुलींच्या सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न मंडपात पाचही नववधू पोहचल्या. लग्न लागण्यास काही अवधी शिल्लक असतानाच भरोसा सेलमधील पाच महिला पोलीस कर्मचारी तिथे पोहचल्या. त्यांनी स्वत:कडून आणलेली ‘माहेरची साडी’ नववधूंना सोपवली. साडी बघताच नवरी मुलींच्या डोळय़ात टचकन पाणी आले. त्यांनी खाकी वर्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मिठी मारत आईच्या मायेची उणीव भरून निघाल्याची भावना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस म्हटले की जरब, धाक आणि वचक असे चित्र मांडले जाते. मात्र, पोलिसांच्या आतही एक माणुसकी जपणारे मन असते. त्याच प्रेमाचा प्रत्यय या विवाह सोहळय़ात आला. नागपुरातील श्रद्धानंदपेठ अनाथआश्रमात लहानाच्या मोठय़ा झालेल्या पाच तरुणींच्या लग्न सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाचा दिवस उजाडला. अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. लग्नापूर्वी हळद आणि अन्य प्रथा आटोपल्या. लग्नमंडपात पाचही नवरदेव पोहचले. काही वेळातच नववधूसुद्धा आल्या. दरम्यान. नागपूर शहर पोलीस दलाच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत ५ ते ६ महिला कर्मचारी लग्नमंडपात पोहचल्या. वरपित्याची जबाबदारी असलेल्या बी.सी. भरतिया, ज्ञानेश्वर रक्षक, प्रभाकर देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर नववधूच्या वेशात बसलेल्या पाचही तरुणींची महिला पोलिसांनी गळाभेट घेतली. महिला पोलिसांनी सर्व नववधूंना ‘माहेरची साडी’ आणि भेटवस्तू दिली. साडी बघताच नववधूंच्या डोळय़ात पाणी तरळले. माहेरून आलेल्या भेटीसारख्याच आनंदाने त्यांनी या भेटवस्तूचा स्वीकार केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police bring saree to orphan girls wedding orphanage at shraddhanandpethe amy
First published on: 01-07-2022 at 13:50 IST