नागपूर : या जगात कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही, की कोणाला घरबसल्या लॉटरी लागत नाही. त्यामुळे समाज माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या प्रलोभनांना, अफवांना नागरिकांनी बळी पडू नये, यासाठी नागपूर पोलिसांनी गरूड दृष्टी या प्रकल्पातून मोठे यश मिळवले आहे. त्याचे पेटंट गृह विभागाकडे आहे. नागपूरचा हा पथदर्शी प्रकल्प राज्यातल्या इतरही जिल्ह्यांत राबविला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टी या सोशल मीडिया मॉनिटरिंग साधन सादरीकरणाचे अवलोकन आणि सायबर फसवणूकीत बळी पडलेल्या नागरिकाना १० कोटी रुपयांच्या परतफेडीची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेसी, राजेंद्र दाभाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

समाज माध्यमे ही आधुनिक युगातल्या अभिव्यक्तीचे माध्यम असले तरी हे अनियंत्रित हत्यार बनत आहे, असे सुरुवातीलाच नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाज माध्यमांवरून द्वेश, अफवा पसरवणे, समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणे, अंमली पदार्थांची बाजारपेठ सारख्या गुन्हेगारीकरणासाठी त्याचा गैरवापर होत आहे. समाज माध्यमांचे आका परदेशात बसतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. मात्र गरुड दृष्टीतून अफवांना आवर घालून समाजमाध्यमांचा गैर वापर करणाऱ्यांना शोधता येते. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांसह इतर विभागांमध्येही गरूड दृष्टी या पथदर्शी प्रकल्पाचा विस्तार केला जाईल, असेही ते म्हणाले.

सायबर फसणवूकीत गोल्डन अवर महत्त्वाचा

आरोग्यासाठी जसा गोल्डन अवर महत्वाचा असतो, तसेच सायबर, ऑनलाईन फसवणूकीतही गोल्डन अवर महत्त्वाचा ठरतो, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सायबर शाखेकडे लगेच दाद मागितली तर झालेल्या व्यवहारानंतर बँक खाते गोठवता येते. मात्र तक्रार करण्यास विलंब झाला तर सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खात्यात पैसे वळती करून घेण्यास रोखता येते.

जगात कोणतीही गोष्ट मोफत नाही

या जगाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट मोफत मिळत नाही, असे ठामपणे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवसी म्हणाले, न काढलेल्या लॉटरीचे बक्षिस कसे लागेल, हा प्रश्न आधी प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. प्रलोभनांना बळी न पडता बुद्धीचे डोळे उघडले तर सायबर फसवणूक टाळता येते. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्टची भिती दाखवत नवनवीन युक्त्या करत आहेत. त्यामुळे त्यांच्या डिजिटल फूटप्रिंट शोधण्यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणांनाही दोन पावले पुढे जावून तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.