नागपूर : अविवाहित महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण वाढत असून यात १८ वर्षांहून कमी वयोगटातील मुलींचे जास्त आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) प्रसूतीसह इतर उपचारासाठी आलेल्या महिलांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जानेवारी २०२३ ते जून २०२४ दरम्यान प्रसूतीसह उपचारासाठी आलेल्या १२४ अविवाहित महिलांवर हा अभ्यास करण्यात आला. त्याचे नेतृत्व डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पी. बी. राऊत आणि डॉ. यू. डब्ल्यू. नारलावर यांनी केले. या अभ्यासात एकूण गर्भधारणा झालेल्यांमध्ये ६७ मुली १८ वर्षांखालील असल्याचे पुढे आले. १८ ते २१ वयोगटातील ३० , २२ ते २५ वयोगटातील २१ तर २५ वर्षावरील ६ प्रकरणे आढळली.
४८ टक्के महिलांकडून प्रसूतीचा निर्णय
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येथे गर्भधारणा झालेल्या अविवाहित महिलांपैकी ३३ टक्के महिलांनी गर्भपाताचा निर्णय घेतला तर ४८ टक्के महिला प्रसूतीच्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यातही २४ आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला. २४ आठवड्यानंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते.
निम्याहून जास्त मुले कमी वजनाची
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे अविवाहित महिलांपैकी प्रसूती झालेल्या ७५ प्रकरणांपैकी ५४ टक्के बाळ कमी वजनाचे होते. १२ टक्के बाळांचा दुदैवी मृत्यू झाल्याचेही अभ्यासात पुढे आले. ६ अपूर्ण गर्भपात, ५ घरगुती प्रसूती, ४ रुग्ण पसार आणि ३ ‘लिव-इन’ रिलेशनशिपची प्रकरणेही नोंदवली गेली.
मेडिकल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉकर काय म्हणतात ?
“अविवाहित असताना गर्भधारणा ही वैयक्तिक नाही तर सामाजिक, कौटुंबिक व आरोग्याशी संबंधित समस्या आहे. सामाजिक कलंकाच्या भीतीपोटी अनेक महिला वेळेवर उपचार घेत नाहीत. त्यामुळे माता व बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. शासनाने अविवाहित मातांसाठी पुनर्वसन योजनेसह जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. दरम्यान या सामाजिक विषयावर मेडिकल रुग्णालयातील संशोधक चमूकडून आणखी अभ्यास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे संशोधन डॉ. गावंडे यांनी जम्मू काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे ११ ते १३ एप्रिल रोजी झालेल्या आयएपीएसएमकॉन- २०२५ या राष्ट्रीय बोलरोग तज्ज्ञांच्या परिषदेत सादर केले.