नागपूर : घरफोडीच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलेला आरोपी हर्ष महेद्र रामटेके (२३) रा. भंडारा हा नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून पळाला. त्यामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.सीसीटीव्हीत तो कैद झाला आहे.
हर्ष रामटेकेला घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. १७ मे रोजी रात्री २.३० वाजताच्या सुमारास तो तेथून पळाला. विशेष म्हणजे रुग्णालयात सुरक्षा रक्षक तैनात असताना त्यांना चकमा देऊन हर्ष फरार झाला.
विशेष म्हणजे हर्ष वॉर्डमधून बाहेर पडतानाचे दृश्य सीसीटीवही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तो वॉर्डमधून बाहेर पडत असताना एक सुरक्षा रक्षक खुर्चीवर बसलेला सीसीटीव्हीत दिसतो. पण त्याने हर्षला हटकले नाही. हर्ष मुख्य दरवाजा उघडत असताना अडखळा होता. मात्र प्रयत्न केल्यावर तो उघडला व तेथून तो पसार झाला. त्याने गुलाबी रंगाची टी शर्ट घातली होती. त्याचा पोलीस शोध घेत आहे. त्याचे छायाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे.
एकूणच आरोपी फरार झाल्याने मेडिकलच्या सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा उघड झाला आह. आरोपी फरार होण्यास पोलिसांचे दुर्लक्षही कारणीभूत आहे. आरोपी उपचार घेत असताना त्यावर देखरेख ठेवणे आवश्याक आहे. रात्रीला एखादी आरोपी बिनद्दिकतपणे वॉर्डाच्या बाहेर पडतो आणि त्याला कोणी अडवत सुद्धा नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.