नागपूर : महाल गांधी गेट परिसरात सोमवारी १७ मार्चला दोन गटात दंगल उसळली होती. दंगलीत एका विशिष्ट गटाकडून इरफान अन्सारी (३८, बंदे नवाजनगर) या युवकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत इरफान गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. या हत्याकांडात एका आरोपीला अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष श्यामलाल गौर (२८, हंसापुरी, टीमकी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान अन्सारी हा वेल्डींग काम करणारा मजूर होता. तो १७ मार्चला इटारसीला काम करायला जात होता. रेल्वेस्थानकाकडे पायी जात असताना दंगलग्रस्त हंसापुरात एका विशिष्ट गटातील युवकांनी इरफानला मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याला पोलिसांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सहा दिवसांनंतर शनिवारी सकाळी अकरा वाजता इरफानचा मृत्यू झाला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. इरफानच्या हत्याकांडात संतोष गौर याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. इरफान अन्सारीला १७वर्षाची मुलगी आणि पत्नी असून इरफान हा घरातील एकमेव कमावता व्होता.

३० ते ४० आरोपींचा समावेश?

इरफानवर जवळपास ३० ते ४० युवकांनी हल्ला केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाच आरोपीचा चेहरा स्पष्ट झाला. संतोष गौरला अटक करण्यात आली. मात्र, उर्वरित ३० ते ४० आरोपींचा शोध तहसील पोलीस घेत आहेत. पोलीस कोठडीत संतोषकडून अन्य आरोपींची नावे समोर येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दंगलीत झालेल्या मारहाणीत मृत पावलेला इरफान अन्सारी याच्या हत्याकांडात संतोष गौर याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. – संजय सिंग ( ठाणेदार, तहसील पोलीस स्टेशन)