नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरण उपलब्ध करून देणे हे आहे. परंतु, नागपुरात याच्या अगदी उलट चित्र आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पापासून अगदी काही अंतरावर असलेल्या भांडेवाडी क्षेपणभूमीत वारंवार आगीच्या घटना घडत असून आगीमुळे पसरणारा विषारी धूर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

केंद्र सरकारने हा प्रकल्प जून २०१५ मध्ये सुरू केला. त्यासाठी निवड झालेल्या पहिल्या १०० शहरांमध्ये नागपूरचा समावेश होता. पारडी, भांडेवाडी, पुनापूर व भरतवाडा येथे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रस्तावित आहे.१७३० एकर परिसरात विकास कामे केली जाणार आहेत.स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरणाची निर्मीती करणे हे आहे. नागपुरात हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करायचा होता.त्याची एकूण किंमत १,७३० कोटी आहे. परंतु, २०२५ उजाडले तरी अजूनही अनेक कामे शिल्लक आहेत.

भांडेवाडी क्षेपणभूमीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याला वारंवार आगी लागत आहेत. या आगीमुळे परिसरात धूर पसरतो आणि नागरिकांचा श्वास गुदमरतो. अलिकडेच १९ एप्रिल २०२५ रोजी येथे मोठी आग लागली होती. ती विझवण्यास एक आठवडा लागला. त्यानंतर १६ मे २०२५ रोजी याच ठिकाणी पुन्हा आग लागली. यापूर्वीही प्रत्येक उन्हाळ्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी प्रकल्प राबवून स्वच्छ, सुंदर आणि अत्याधुनिक नागरी सुविधांनीयुक्त शहर उभारण्याची कल्पना मांडायची आणि दुसरीकडे दरवर्षी कचऱ्याला आग लागण्याचा घटना घडायच्या असे विरोधाभासी चित्र येथे दिसत आहे. धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून आगीच्या घटना कमी होतील आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही-अवंतिका लेकुरवाळे, माजी शिक्षण सभापती.