वर्धा : सध्या पावसाळ्याचे दिवस सूरू आहे. शेतीकामे पण जोरात. याच दिवसात सापांचा सुळसुळाट दिसून येतो. सर्पदंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यावर उपचार पण आहेत. सरकारी दवाखान्यात इंजेकशन देऊन वेदना थांबविण्याचे व प्राण वाचविण्याचे प्रयत्न केल्या जात असतात. पण असे वैज्ञानिक उपचार नं करता बाबा बुवाकडून मंत्र तंत्र करीत उपाय करण्याचे प्रकार आजही प्रामुख्याने ग्रामीण भागात होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र असे प्रकार कधी जीवावर बेततात. आणि तसे केल्यास कायदेशीर कारवाई पण होवू शकते. ही बाब अनेकांच्या गावीही नसते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन करणे सूरू केले आहे. समितीचे राज्य सचिव व विदर्भ सर्पमित्र मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र सुरकार म्हणतात की सर्पदंश यावर हमखास औषध असल्याची लोकांना माहितीच नाही. त्यामुळे आजही लोकं साप चावल्यास अघोरी उपचार करण्यास धाव घेतात. ज्यात आजवर अनेकांचा मृत्यू झाला असल्याचे सुरकार निदर्शनास आणतात.

साप चावला की बाऱ्या म्हणणे, मंत्र म्हणणे, एखादा खडा जखमेवार लावणे, लाल मिरच्या, कडू लिंबाचा पाला मोठ्या प्रमाणात खायला घालणे, चिरा देणे, तोंडाने विष ओढणे असे व अन्य अवैज्ञानिक प्रकार उपचार म्हणून केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच कुत्रा, विंचू, इंगळी चावली तर असेच चुकीचे उपचार केल्या जात असल्याची पाहणी आहे. आणि मृत्यू जर ओढवला तर तुम्हीच यायला उशीर केल्याचा बहाणा करीत हे मांत्रिक हात झटकतात. त्यांना विषारी किंवा बिनविषारी सापांची ओळख पण नसते.

सर्पदंश लक्षणे त्वरित ओळखून उपचार करावे लागतात. नाग, मन्यार, फुरसे व घोणस या चारही विषारी सापांच्या दंशावर हमखास उपचार असणारे औषध उपलब्ध आहेत. दंश झाल्यास सरकारी रुग्णालयातच उपचार करण्याची खबरदारी घेण्याचे अनिसद्वारे आवाहन करण्यात आले आहे. अनिसने याबाबत प्रबोधन मोहीम राबवून माहिती देणे सूरू केले आहे. सर्प विज्ञान व पर्यावरण असा मुद्दा शाळांमध्ये मांडल्या जातो. अघोरी उपचार होत असल्याने महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा लागू केला. त्यात अघोरी उपचार केल्यास उपचार घेणारा, उपचार करणारा, त्यास सहकार्य करणारे अशा सर्वांवर या कायद्याने कारवाई होते. सात वर्ष कारावास तसेच ५० हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. प्रबोधन कार्यात मुख्याध्यापक अर्चना देशमुख, भाग्यश्री अहिरे, अमोल झिकरे, रजनी सुरकार, विमलेश कामडी, प्रियंका कामडी, नरेंद्र परतेकी, सविता चव्हाण, प्रशांत वघळे, प्रीती तिमांडे यांचा सहभाग आहे.