नागपूर: बालकांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच इंजेक्शनची भीती वाटत असते. बालकांना इंजेक्शन देताना तर पालकांनाही मोठी कसरत करावी लागते.

लस किंवा इंजेक्शन घेताना आणि त्यानंतर प्रचंड वेदना होतात. त्यामुळे यावर काही संशोधकांनी उपाय शोधला आहे. त्यामुळे यापुढे इंजेक्शन घेताना वेदना होणार नाही. शहरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधील (व्हीएनआयटी) यांत्रिक अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. रश्मी उद्दनवाडीकर यांच्या मार्गदर्शनात बालकांना वेदनारहित इंजेक्शन देता येईल अशा उपकरणाची रचना करण्यात आली.

यासाठी वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनेही मदत केली. या उपकरणाची मूळ संकल्पना दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांची आहे. व्हीएनआयटीने या उपकरणाची रचना केली आहे. यासाठी डॉ. अर्चना मौर्य, संचित चौहान यांनीही मदत केली. या उपकरणाला ‘आ’ राम’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय स्वामित्व हक्क कार्यालय, मुंबईने या संशोधनाला ‘स्वामित्व हक्क’ दिले आहे.

तसेच लहान मुलांवर याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. लहान मुलांना लसीकरण, इंट्रामस्क्युलर (आयएम) इंजेक्शन, इंट्राव्हेनस इंजेक्शन किंवा कॅन्युलेशन दरम्यान वेदना कमी करण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या उपकरणामध्ये ध्वनी आणि दृश्य अशा दोन्ही गोष्टींचा वापर करण्यात आला असून या माध्यमातून लक्ष विचलित केले जाते. तसेच हे उपकरण तयार करताना बालकांमधील इंजेक्शनच्या वेदना कमी करणारा ‘वेदनेचा गेट कंट्रोल सिद्धांत’ वापरण्यात आला आहे.

उपकरणाचे स्वरूप कसे?

हे उपकरण रुग्णाला इंजेक्शन देण्याच्या जागेपासून ५ सेमीच्या अंतरावर दंडावर बांधले जाते. उपकरण सुरू करताच त्यात कंपन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे वेदनेची जाणीव होत नाही. तसेच त्यात संगीत आणि चमकणाऱ्या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बालकांचे लक्ष विचलित करण्यास मदत होते. हे उपकरण सुरू होताच नजीकची जागा थंड होत असल्यानेही इंजेक्शनच्या वेदनेची जाणीव होत नाही, असा संशोधकांचा दावा आहे.

इंजेक्शनची भीती सर्वांनाच वाटते. त्यामुळे हे उपकरण तयार करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात या उपकरणाची रचना लहान मुलांच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यातील ध्वनी, दृश्य आणि कंपन तत्त्वामुळे इंजेक्शनच्या वेदनेची जाणीव होणार नाही. – डॉ. रश्मी उद्दनवाडीकर, विभाग प्रमुख, यांत्रिक अभियांत्रिकी, व्हीएनआयटी.