वर्धा : अध्ययनासोबतच अभिनयादी कला पारंगत होणारी मुलं विरळाच. त्यात पुन्हा भातुकली खेळण्याच्या वयात कलानिपुण होत राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणे फार कौतुकाची बाब समजल्या जाते. या चिमुरडीने पण असेच लक्ष वेधले आहे. येथील डॉ. रेणुका व डॉ. आनंद गाढवकर या दाम्पत्याच्या ९ वर्षीय ईशा या कन्येने असाच इतिहास रचला आहे.

स्थानिक अग्रगामी कॉन्व्हेन्ट मध्ये शिकणाऱ्या ईशाने एका आठवड्यात दोन पुरस्कार जिंकले आहे. राष्ट्रीय कला मंचतर्फे आयोजित नृत्योत्सव ३ मध्ये सेमी क्लासिकल नृत्य प्रकारात प्रथम पुरस्कार पटकवला. तर लगेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपुरात सांस्कृतिक ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. त्यात ईशाने लोककला नृत्य प्रकारात पुन्हा प्रथम पुरस्कार जिंकला आहे. याखेरीज अन्य अनेक पुरस्कारांनी ईशाची झोळी तुडुंब भरली आहे.

शालेय अभ्यासात अव्वल राहून तिने नृत्यात नैपून्य साधले आहे. गुरू सचिन डंभारे यांच्या मार्गदर्शनात ती घडली. गत चार वर्षांपासून ती भरतनाट्यमच प्रशिक्षण घेत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ईशाने आपल्या कलागुणांची चुणूक दाखवायला सुरवात केली. कथाकथन व गायनाची आवड पण तिने जपली. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिने रेडिओ एम गिरी येथे गणपती स्तोत्र सादर करीत वर्धेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच रामरक्षा स्तोत्र व अन्य श्लोक तिला पाठ आहेत. पुढे नृत्यात तिने अधिक सराव सूरू केला. जिमनास्टिक शिकणे सुरूच आहे. नृत्य तरबेज झाल्यानंतर ईशाला मग विविध स्पर्धा खुणावू लागल्या.

कला मंचच्या नॅशनल डान्स स्पर्धेत सिझन एक व दोन मध्ये तिने प्रथम पुरस्कार जिंकले. पूणे येथे संपन्न भारत उत्सव २०२३ मध्ये ती लोककला नृत्य प्रकारात अव्वल आली होती. नटराज सांस्कृतिक संघद्वारा आयोजित आभासी नृत्य स्पर्धेत बाल गटात ती प्रथम आली. हैद्राबादला संपन्न लोक कला नृत्य स्पर्धेत परत प्रथम. कल्चरल फाईन आर्टस् असोसिएशन महाराष्ट्रतर्फे आयोजित चवथ्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत मिनी वयोगटात ईशाने प्रथम पुरस्कार जिंकल्याने मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

ईशाची ही कामगिरी खरंच थक्क करणारी समजल्या जाते. केवळ कला पारंगतच नव्हे तर अभ्यासात पण तिची हुशारी लपून राहली नाही दरवर्षी ९६ टक्के गुण पटकवत ती आघाडीवर राहत असल्याचे तीचे वडील डॉ. आनंद सांगतात. विविध कला, अभ्यास व धर्मग्रंथ वाचन असे चौफेर यश खेचणारी ईशा ही आता पुढील स्पर्धा गाजविण्यास सज्ज झाली आहे.