नागपूर : मोबाईलवर नेहमी गेम खेळत राहतो, अभ्यास करत नाही, अशा शब्दात आईवडील आपल्या मुलांना रागावतात. मोबाईलवर गेम खेळून काय मिळणार? दिवसभर मोबाईलवर चिकटून असतो, असेही घरोघरी ऐकायला मिळते. मात्र नागपूरच्या एका २३ वर्षीय युवकाने मोबाईल गेमिंगच्या विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पोकेमॉन गो नावाच्या प्रसिद्ध मोबाईल गेमच्या स्पर्धेत भारताचे तो प्रतिनिधित्व करणार आहे. शुक्रवार १६ ऑगस्ट पासून अमेरिकेतील हवाईमधील होनोलुलू या शहरात पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीप पार पडत आहे. यामध्ये नागपूर शहरातील २३ वर्षीय वेद बांब याची निवड झाली आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना वीस लाख डॉलर म्हणजेच सुमारे १६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. नागपूरचा २३ वर्षीय तरुण पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. वेद बांब सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. ख्यातनाम पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पात्र ठरलेला तो पहिला भारतीय पोकेमॉन गो खेळाडू ठरला आहे.

अमेरिकेत हवाईमधील होनोलुलू येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ या काळात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. जगातील सर्वात लोकप्रिय गेमिंग कार्यक्रमात सहभागी होत वेद बांब आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये एकूण २० लाख डॉलर्सची बक्षिसे आहेत. एप्रिल २०२४ मध्ये वेद याने भारतातून ऑनलाइन पात्रता फेरीत सहभाग नोंदवला होता. यातील ५०० हून अधिक स्पर्धकांमधून तो दोन फेऱ्यानंतर विजेता ठरला. त्यानंतर भारतातील १५ सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरोधात खेळताना प्रत्येक सामन्यात कोणतेही नुकसान न होता तो जिंकत गेला. नागपूर ते होनोलुलू असा पल्ला गाठणारा पहिला भारतीय म्हणून वेद याने भारतीय ई-स्पोर्ट क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांचा ‘राखीव’ वेळ कुणासाठी?, खासगी विमानाने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पोकेमॉन गो’ काय आहे?

पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रिअलिटी मोबाइल गेम आहे. पोकेमॉन फ्रँचाईझीचा भाग असलेला हा गेम निऑन्टिकतर्फे निर्मित आणि सादर केला गेला आहे. निन्तेंदो आणि पोकेमॉन यांच्या सहभागातील ही कंपनी जगातील सर्वात मोठी ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी भारतात याची मोठी क्रेझ बघायला मिळाली होती. या खेळात एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर लक्ष्य प्राप्तीसाठी जावे लागते. यामुळे अनेक अपघात घडल्याचे वृत्तही समोर आले होते.