नागपूर : ऐतिहासिक वारसा आणि लोकभावनांचा संगम असलेला नागपूरचा मारबत उत्सवाच्या मिरवणुकीला शनिवारी सुरूवात झाली. ही मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. उपस्थितांकडून यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ‘इडा-पीडा घेऊन जा रे मारबत..’सह इतरही घोषणा दिल्या जात आहे.
जगनाथ बुधवारीतून पिवळी मारबत आणि नेहरु पुतळ्याजवळून काळी व लहान पिवळी मारबत मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघाली. “काळ्या- पिवळ्या मारबत घालूया, अन्यायाला थारा नाही!, “महागाईच्या राक्षसाचा वध करा!”, “भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता सोडणार नाही!”, “अन्यायाच्या सावलीला हाकला!”, “पिवळी मारबत बोलते – शहराची स्वच्छता करा, जनता ओरडते!”, “वाहतुकीचा गोंधळ थांबवा, नागरिकांना दिलासा द्या!”, “पाणीटंचाईवर उपाय करा, नाहीतर जनता सवाल करेल!”सह इतरही घोषणा दिल्या जात आहे.
लक्षवेधी बडगे
यंदा शहरातील विविध मंडळांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे बडगे उभारले आहे. यावर्षीचे बडगे दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता अशा विषयांवर लक्ष केंद्रीत करत आहे.अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगामजवळ भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतवाद्यांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर लादलेल्या अवास्तव कराच्या धोरणावरही टीका केली जात आहे. त्यामुळे यंदा नागपूरकरांची घोषणाबाजी केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाही स्पर्श करत आहे. ही मिरवणूक नागपुरातील नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्हीटी पार्क चौक, अमरावती रोडसह विविध भागांतून बडगे मिरवणुकीत सहभागी होत आहेत. शहरातील विविध मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मंडळांनी यंदा मारबत महोत्सवात महागाई, वाढते वीजबिल, स्मार्ट मीटरची समस्या, तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर जनजागृती करणारे पुतळे उभारले आहेत. यामधून नागरिकांनी प्रशासन आणि सरकारला दिलेला थेट संदेश लक्षवेधी ठरणार आहे.
मारबत महोत्सवाचे वेगळेपण काय ?
मारबत उत्सवाचे वेगळेपण म्हणजे समाजातील चुकीच्या प्रवृत्तींची थेट खिल्ली उडवून नागरिकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे. यामुळेच प्रत्येक वर्षी नागपूरकरांची आतुरतेने प्रतीक्षा असते. नागपूरचा मारबत उत्सव हा केवळ परंपरेचा भाग नसून सामाजिक जाणीव, लोकसहभाग आणि व्यंगाचा जिवंत उत्सव आहे. आता सुरू झालेल्या मिरवणुकीतील लोकांच्या उत्सवातून ते दिसतही आहे.