नागपूर : जॉर्जिया येथील बातुमी येथे आयोजित फिडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 वर अवघ्या 19 व्या वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुखने आपली मोहर उमटवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय खेळाडू ग्रॅण्ड मास्टर कोनेरु हम्पीला चेकमेट करत बुद्धीबळातील हा विश्वकप तिने अलगद आपल्याकडे खेचून घेत ’88 वी भारतीय ग्रॅण्ड मास्टर’ हा किताब मिळविला. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 ऑगस्ट रोजी जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नागपूर कन्येच्या या जागतिक यशाबद्दल आयोजित समारंभासाठी नागपूरकरांसह जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, 2 ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागृहात सकाळी 11.30 वाजता आवर्जून सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत व्यक्त केला. या सोहळ्यास जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. या विशेष समारंभासाठी आयोजन समितीसह विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित बैठकीस जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे एस. एस. सोमण, महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.