scorecardresearch

फेरीवाल्यांनी पदपथावर ठोकलेले खिळे ठरताहेत जीवघेणे

अनेकजण खिळय़ांमुळे जखमी होतात किंवा अनेकजण आकोडय़ाला अडकून खाली पडतात

१६ एप्रिलला येथे ‘मॉर्निग वॉक’ करताना खिळय़ात पाय अडकून मी पडली. – अरुणा बारहाते, नागरिक.

अनेक पादचाऱ्यांना जखमा; महापालिका निद्रावस्थेत; वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष

नागपूर : रस्त्यावरील फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते  तंबू उभारण्यासाठी पदपथावर खिळे ठोकतात. त्यात पाय अडकून पादचाऱ्यांना अपघात होत असून यामुळे अनेक जण जखमी झाले तर काहींची हाडेही मोडल्याच्या तक्रारी आहेत. या गंभीर बाबींकडे महापालिका व पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

शहरातील सर्व प्रमुख पदपथ खाद्यपदार्थ व अन्य विक्रेत्यांच्या ताब्यात आहेत. उन्हाळय़ासह इतरही हंगामात विक्रेते ग्राहकांना बसण्यासाठी तंबू ठोकतात. कापडही लावतात. ते बांधण्यासाठी पदपथावर खिळे, लोखंडी आकोडे ठोकले जातात. रात्री दुकाने बंद करताना ते काढले जात नाहीत. त्यामुळे रात्री जेवणानंतर शतपावली करणारे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे त्याकडे लक्ष राहात नाही. त्यामुळे अनेकजण खिळय़ांमुळे जखमी होतात किंवा अनेकजण आकोडय़ाला अडकून खाली पडतात. याबाबत अनेक तक्रारी लोकसत्ताकडे प्राप्त झाल्या आहेत. एक महिला अशाच प्रकारे आकोडय़ात पाय अडकल्याने खाली पडून जखमी झाली होती. तिचे हाड मोडले. उपचारावर लाखो रुपये खर्च झाले.  विजयनगर भागातील दोन नागरिक व्हीएनआयटी मार्गावरून जात असताना फेरीवाल्याच्या दुकानातील फोडणीचे तेल डोळय़ात गेल्याने पडले. याचा सर्वाधिक मनस्ताप फुटाळा तलाव, अंबाझरी ते व्हीएनआयटी या भागातील लोकांना होतो. येथे फेरीवाले सर्रास रस्त्यांवर व पदपथावर दुकाने लावतात. त्यांना कुणीही हटकत नाही. फोडणीचे शिंतोडे थेट नागरिकांच्या डोळय़ात, नाका-तोंडातही जातात. या प्रकाराकडे दैनिक लोकसत्ताने लक्ष वेधल्यावरही  महापालिका व वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय. महापालिकेसह वाहतूक पोलिसांचे या विक्रेत्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. 

शहरात साडेपाच हजारांवर फेरीवाले

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत सुमारे सात हजार नोंदणीकृत फेरीवाले आहेत. यापैकी साडेपाच हजार नागपूर शहरात असल्याची नोंद अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (अन्न) आहे. यापेक्षा दुपटीहून अधिक अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करतात, अशी माहिती आहे. विक्रेत्यांच्या बेजबाबदारपणाचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होतो.

फुटाळा तलाव परिसरात चायनीज गाडय़ांजवळ विक्रेते सर्रास खिळे ठोकतात. १६ एप्रिलला येथे ‘मॉर्निग वॉक’ करताना खिळय़ात पाय अडकून मी पडली. हाताच्या हाडाचे तीन तुकडे झाले. डॉक्टरांनी २३ टाके लावले. उपचारावर तब्बल सव्वा लाखांचा खर्च झाला. निदान अधिकाऱ्यांनी इतरांचा जीव वाचवण्यासाठी या विक्रेत्यांवर कारवाई करावी.

अरुणा बारहाते, नागरिक.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nails driven into the sidewalk by the peddlers are becoming life threatening zws

ताज्या बातम्या