नागपूर : निवडणूक विश्लेषक आणि लोकनीती-सीएसडीएसचे (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) समन्वयक संजयकुमार यांनी जुने ट्विट डिलिट करून माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चुकीची माहिती ट्विट टाकल्याप्रकरणी गुन्हा होत असेल तर निवडणूक आयोगाने सुद्धा चुकीचे ट्विट केले आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दखल झाले पाहिजे, असे अशी मागणी काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी येथे केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याही विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
संजय कुमार यांनी आपल्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रातील रामटेक विधानसभा मतदारसंघ क्रमांक ५९ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ४,६६,२०३ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८६,९३१ वर आली, म्हणजेच ३८ टक्के मतदार कमी झाले. तसेच, देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४,५६,०७२ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८८,१४१ इतकी झाली. म्हणजेच ३६ टक्के मतदार कमी झाले. या आकडेवारीचा आधार घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला होता.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मतचोरीचा आरोप करत आहेत. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगालाच धारेवर धरले आहे. आयोग भाजपच्या प्रवक्त्याचे काम करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यात संजय कुमार यांनी चुकीचा डेटा दिल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना आणखी बळ मिळाले आहे. हीच संधी साधून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची आम्ही सातत्याने तक्रारी करत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या पाच महिन्यांत लाखो मतदारांची वाढ कशी झाली, याची विचारणा करत आहोत. सायंकाळी ५ वाजेनंतर १५ ते २० टक्के मतदान झाले, याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागत आहोत. मात्र ते दिले जात नाही. निकालानंतरही दोन – तीन वेळा मतदानाची टक्केवारी बदलण्यात आली आहे, असे सांगून नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाचा कारभार बोगस असल्याचा आरोप केला.