चंद्रशेखर बोबडे

नागपूर : विदर्भातील एकूण उत्पादित संत्रीपैकी निम्मी संत्री खरेदी करणाऱ्या दक्षिणेतील राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ते व रेल्वेचे मार्ग बाधित झाल्याने त्याचा परिणाम संत्री वाहतुकीवर झाला आहे. यामुळे बाजारपेठेत उत्पादकांकडून खरेदीच्या दरात प्रतिकिलो ३० ते ३५ रुपयांवरून १७ ते २३ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

दरवर्षी  नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे विदर्भातील संत्री  उत्पादक यंदा इतर राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आले आहेत. विदर्भात अमरावती, नागपूर, वर्धा हे प्रमुख संत्री उत्पादक जिल्हे मानले जातात. देश-विदेशात येथील संत्री प्रसिद्ध आहे. येथे उत्पादित एकूण संत्रीपैकी ५० टक्के दक्षिणेतील राज्यात, २५ टक्के बांगलादेश व २५ टक्के उत्तर भारतात पाठवली जाते. दक्षिणेत जाणारी संत्री ही सर्वाधिक अंबिया बहाराची असते. कारण आंबट गोड चव हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जाते. हीच संत्री सध्या विक्रीसाठी तयार आहे.

दरवर्षी दक्षिणेतील कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश तेथील व्यापारी विदर्भात येऊन संत्री खरेदी करतात. दक्षिणेतून मसाले, मिरची घेऊन येणारे ट्रक परत जाताना विदर्भातून संत्री घेऊन जातात. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सुमारे ५०० हून अधिक ट्रक संत्री येथून जाते, असे व्यापारी सांगतात.यंदाही नेहमीप्रमाणे सुरुवातीला संत्री पाठवली गेली. उत्पादकांना प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये याप्रमाणे दर मिळाले. मात्र अलीकडेच दक्षिणेतील राज्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. रेल्वे व रस्ते मार्ग बाधित झाले. त्यामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून विविध प्रकारचा माल घेऊन येणाऱ्या ट्रकचे प्रमाण कमी  झाले. तेथून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही कमी झाली. शिवाय तिकडून ट्रकच येत नसल्याने येथून संत्री न्यायची कशी हा प्रश्नही कायम आहे. बाजारपेठेत खरेदीदार कमी झाल्याने स्पर्धा कमी झाली. त्याचा परिणाम दर घसरणीत झाला. त्यामुळे दरात प्रतिकिलो ३० ते ३५ रुपयांवरून १७ ते २३ रुपयांपर्यंत घसरण झाली. उत्पादकांकडून खरेदीचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात मात्र संत्री आजही चढय़ा दराने म्हणजे १०० ते २०० रुपये प्रतिडझन या दराने विकली जात आहे, हे येथे उल्लेखनीय.

नागपूर संत्री फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष व महाऑरेंजचे संचालक मनोज जंवजाळ यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, केरळ व  दक्षिणेतील  इतर राज्यातून व्यापारी कमी आल्याने या आठवडय़ात दर पडले. पण त्या भागातील स्थिती सुधारल्यावर बाजारपेठेतील चित्र बदलेल. नागपूर जिल्ह्य़ातील प्रगतशील शेतकरी व संत्री उत्पादक अमिताभ पावडे म्हणाले, अंबिया हंगामाची संत्री विकायला काढली तेव्हा दर ३० ते ३४ रुपये किलो असे होते. पण आता १७ ते १८ रुपये प्रतिकिलोने व्यापारी मागतात. यातून खर्चही निघत नाही. विदर्भातील सर्वात मोठय़ा कळमना बाजारातील संत्री खरेदी विक्रीतील मध्यस्थ काशीनाथ अतकरे यांनीही दक्षिणेतीतील राज्यात झालेल्या पावसाचा परिणाम संत्री विक्रीवर झाल्याचे मान्य केले. दरवर्षी ४०० ते ५०० ट्रक माल जातो. सध्या त्याचे प्रमाण नगण्य आहे, असे त्यांनी सांगितले.

नागपूरची संत्री देशविदेशात प्रसिद्ध असली तरी  विदर्भात साठवणुकीसाठी पुरेशा प्रमाणात शीतगृहांची व्यवस्था नसल्याने व हे फळ नाशवंत असल्याने उत्पादकांना मिळेल त्या दरावर विकण्याशिवाय पर्याय नाही. त्याचा फटका दरवर्षी उत्पादकांना बसतो. कारणे मात्र वेगवेगळी असतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील संत्र्यांची लागवड

एकूण क्षेत्र -१ लाख ५०  हजार हेक्टर

प्रत्यक्ष उत्पादन- १ लाख हेक्टर

अमरावती जिल्हा- ७० हजार हेक्टर

नागपूर जिल्हा- ४० हजार हेक्टर

इतर जिल्हे- ४० हजार हेक्टर