अमरावती : आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असून कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही, असे वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असेही आश्वासन नवनीत राणा यांनी दिले.

राजापेठ येथील भाजपच्या कार्यालयात भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आणि यशस्वी होणार. या निवडणुकीत निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येईल. भाजप हा विचारांना घेऊन चालणारा पक्ष आहे. मी भाजपमध्ये प्रवेश घेऊन एक वर्षाचा कालावधी झाला असला, तरी अपक्ष खासदार असताना पाच वर्षे भाजपच्या विचारांचेच समर्थन केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी हे पाहिले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मी हवेत बोलणारी व्यक्ती नाही. मी जमिनीवर राहून लोकांची सेवा करणारी कार्यकर्ती आहे. लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पदावर राहून आणि पद नसताना सुद्धा मी करीत आहे. मी भाजपमध्ये कोणतेही पद स्वीकारले नसले, तरी भाजपला मजबूत करण्याचे काम मी स्वीकारले आहे. मी गेल्या १३-१४ वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात काम करीत आहे. भाजपचे नवनियुक्‍त शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करतील, याचा विश्वास मला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना सदैव सोबत घेऊन चालतात. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भाजपचे मतदार आहेत. भाजप परिवारामध्ये कुणी येत असेल, तर मनमोकळेपणाने त्यांचे स्वागत केले पाहिजे, त्यात कुणी शंका ठेवली, तर चुकीचे होईल. मोठे मन करून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवीन लोकांना स्वीकारावे. माझा राजकीय क्षेत्रातील अनुभव कमी असला, तरी मी आतापर्यंत भाजपच्याच विचारांवर श्रद्धा ठेवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणा म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. काही चुका झाल्या, पण आता महापालिका निवडणुकीत चूक होणार नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत ४५ जागा जिंकून भाजपने इतिहास रचला होता. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाडापाडीचे राजकारण झाले, पण आता महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायचे आहे.