अमरावती : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी ‘एनडीए’ला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यावर भाजप आणि विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. त्यातच भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बिहारच्या जनतेने नाकारल्याबद्दल चांगलाच टोला लगावला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, बिहारच्या लोकांनी एनडीएच्या बाजूने त्सुनामीसारखा निकाल दिला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे, परिश्रमाचे हे फळ आहे. देश प्रेमाचे हे द्योतक आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आजच्या युगातील चाणक्य अमित शहा यांच्यावर दृढ विश्वास व्यक्त केला आहे.
पण, याचवेळी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या निकालापासून आता तरी धडा घ्यायला हवा. केवळ ईव्हीएमवर बोलून चालणार नाही. प्रत्यक्ष मैदानावर लोकांसाठी त्यांना काम करावे लागणार आहे. ईव्हीएमच्या नावावर मोर्चे काढणे आता तरी थांबवा, माझा काँग्रेसच्या नेत्यांना आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला आहे, की आता तरी सुधारा. ईव्हीएमवर रडणे बंद करा. आता तरी त्यांनी ईव्हीएमचा ड्रामा बंद केला पाहिजे. केवळ आरोप करून चालणार नाही. लोकांना कोण आपले आहेत आणि कोण परके आहेत, हे चांगले कळते, असा टोला त्यांनी लगावला.
युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचारांवर चालत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम करीत आहेत. केवळ ईव्हीएमवर आरडाओरड करून चालणार नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी ईव्हीएमविषयी आरोप करून रान पेटवण्याचा प्रयत्न केला, पण हा निकाल म्हणजे बिहारच्या जनतेने दिलेली चपराक आहे, असे रवी राणा म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस कुठेही शिल्लक राहिलेली नाही. आपल्या देशाचा पप्पू राहुल गांधी आणि महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरे आहे, हेही आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. रवी राणा म्हणाले, बिहारचा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला पसंती दिली आहे. जनतेसाठी आधी काम करावे लागते, तेव्हा जनतेचे प्रेम मिळत असते. केवळ आरोप करून चालत नाही, असेही रवी राणा म्हणाले.
