गडचिरोली : सहा राज्यात दहशत असलेला जहाल नक्षल नेता तसेच केंद्रीय समिती सदस्य टेंटू लक्ष्मी उर्फ सुधाकर उर्फ गौतम उर्फ नरसिंहचलम नायडू (६५, चिंतलपौडी आंध्रप्रदेश) याला ठार करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे.

५ जूनला छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुधाकरवर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यात मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.

५ जून रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य नरसिंहचलम उर्फ सुधाकर उर्फ गौतम, तेलंगणा राज्य समिती सदस्य बांदी प्रकाश, दंडकारण्य झोनल विशेष समिती सदस्य पापा राव यांच्यासह मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती.

यावरून छत्तीसगड पोलिसांच्या ‘डीआरजी’ आणि ‘एसटीएफ’च्या जवळपास एक हजार जवानांनी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली होती. दरम्यान, घनदाट जंगलात दडून असलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जहाल नक्षल नेता तसेच केंद्रीय समिती सदस्य सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. तो सहा राज्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. त्याच्यावर विविध राज्यात सुमारे तीन कोटीहून अधिक बक्षीस होते. यावेळी दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. घटनास्थळावर उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असल्याने आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसवराजूनंतर सुधाकरच्या मृत्यूने नक्षल्यांना धक्का

२१ मे रोजी अबुझमाडच्या जंगलात छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याच्यासह २६ नक्षलवाद्यांना ठार केले होते. बसवराजूच्या मृत्यूने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. काही दिवसापूर्वी पत्रक काढून नक्षल्यांनी तशी कबुलीही दिली होती. यातून सावरत नाही तोच ५ जूनला केंद्रीय समिती सदस्य सुधाकर उर्फ गौतम चकमकीत ठार झाला. त्याचा अनेक मोठ्या हिंसक कारवायामध्ये सक्रिय सहभाग होता. नक्षल चळवळीत त्याला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे पंधरा दिवसाच्या अंतरात नक्षलवाद्यांना दुसरा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे.