राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून सरकारविरोधात विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या ठरावाबद्दल आपल्याला काही माहितीच नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून अजित पवारांच्या या विधानावर खोचक टोला लगावण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

गुरुवारी मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँघ्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रावर ३९ आमदारांची सही असल्याचंही बोललं जात आहे. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, आज सकाळी माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं अजित पवार म्हणाले. “मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे”, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

“…तर त्यावर माझी स्वाक्षरी…”; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडणाऱ्या मविआ आमदारांना अजित पवारांचा घरचा आहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवार सत्याच्या बाजूने असतात”

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यावर शिंदे गटाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. “अजित पवारांचं वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक आहे”, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. तसेच, “अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट असतो. ते सरळ बोलतात. बेधडक बोलतात. ते कुणाकडूनच नसतात. जे खरं आहे त्या बाजूने ते असतात”, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.