भंडारा : मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याने राष्ट्रवादीमधील बंडखोरी पुन्हा चर्चेत आली आहे.  दरम्यान, पुतण्याने काकुचा पराभव करून विजयश्री खेचून आणली आहे.

९ जानेवारी रोजी पार पडलेल्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्याक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकले. यात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार मनीषा गायधने या पराभूत झाल्या, तर राष्ट्रवादीचेच बंडखोर सचिन गायधने निवडून आले. विशेष म्हणजे मोहाडी विधानसभा क्षेत्रावर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार राजू कारेमोरे यांचे अधिराज्य असताना त्यांनाही नगरसेवक जुमानत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : प्रदेश कार्यकारिणीला गैरहजर राहणाऱ्यांना कॉंग्रेस बजावणार नोटीस

भाजपने, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेत आपल्याच पक्षाचे नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ५ मताने पारित केला आणि गभनेंना पायउतार केले. त्यानंतर पुन्हा मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. १७ सदस्यीय मोहाडी नगरपंचायतीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा आणि काँग्रेसचे दोन सदस्य, असे पक्षीय बलाबल आहे. मात्र भाजपमध्ये दोन गट पडले असून एका गटात पाच तर दुसऱ्या गटात चार सदस्य आहेत. काल झालेल्या निवडणुकीत भाजपच्या एका गटाच्या समर्थनाने राष्ट्रवादी काँग्रेसने मनीषा गायधने यांना अधिकृत उमेदवार घोषित केले होते.

हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा दोन गट पडले व राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने सचिन गायधने यांचा अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी १० विरुद्ध ७ मतांच्या फरकाने सचिन गायधने यांना विजयी घोषित करण्यात आले.