नागपूर : समृद्धी महामार्गालगत शेताला केलेल्या तारेच्या कुंपणात बिबट अडकल्याची घटना ताजी असताना, याच घटनेची पुनरावृत्ती करणारी आणखी एक घटना अमरावती शहरात घडली. या बिबट्याने अमरावती शहरालगत महादेव खोरीकडील रस्त्याच्या पुलाखाली चक्क एका पाईपमध्येच ठाण मांडले आणि मग त्याला बाहेर काढण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. प्राणी मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शेवटी त्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आणि मग त्याने थेट जंगलात धूम ठोकली.

अमरावतीशहरातील एक्सप्रेस हायवेच्या वडाळीस्थित खदानाजवळ गुणवंत महाराज मंदिर परिसरात पुलाच्या एका मोठ्या पाईपमध्ये बिबट्याने ठाण मांडले. ते बिबट बाहेरही येईना आणि जंगलाकडेही जाईना. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. मंदिरात येणाऱ्या लोकांनाही त्याठिकाणी जाता येत नव्हते. रविवारी काही नागरिकांना हा बिबट दिसला. तो जवळजवळ ५० फूट लांबीच्या मोठ्या पाईपमध्ये बसलेला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी हातात दगड घेतले आणि त्याला दगड मारुन हाकलण्याचा प्रयत्न करु लागले.

मात्र, यामुळे बिबट त्या ठिकाणाहून निघून जाण्याऐवजी दगड मारणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येण्याचीच शक्यता होती. यात नागरिकांचा जीव जाण्याची देखील शक्यता होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आधी वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे सदस्य अभिजीत दाणी यांना ही माहिती दिली. त्यांनी ही माहिती वनखात्याला कळवली आणि यानंतर या माहितीवरून अभिजीत आणि निलेश कांचनपूरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

वडाळी वनविभागाची चमू देखील तातडीने त्याठिकाणी पोहोचली. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल बाबुराव खैरकर, वनरक्षक चंद्रकांत चोले, वनरक्षक कैलास इंगळे, वन मजूर ओंकार भुरे, वाहन चालक संदीप चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने पाईपमध्ये बसलेल्या बिबट्याला बाहेर काढले. त्याआधी हे बिबट बाहेर येण्यासच तार नव्हते. वनविभागाच्या पथकाच्या महत्प्रयासानंतर बिबट्याला जंगलात हाकलून लावण्यात यश आले. महादेव खोरी आणि वडाळी जंगल परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. नागरी वस्तीत बिबट आढळ्यास नागरिकांनी घाबरून न जाता याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी केले.