कॅनडाचे बौद्ध तत्त्वज्ञ झेंजी निओ यांचे मत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वंचितांना सन्मानाने जगण्याचे पाठबळ दिले. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक दलित, शोषित ताठ मानेने जगत आहे. भारताला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे. संपूर्ण जगयेथील संस्कृतीमुळे प्रभावित आहे. परंतु आजही भारतीय समाजातील जातीवाद, भेदभाव कुठेतरी दूर झाला पाहिजे. त्या दिशेने काम करण्यासाठी कुठल्याही धर्माबद्दल द्वेष न बाळगता सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे, असे मत रविवारी पत्रकारांशी बोलतांना कॅनडाचे बौद्ध तत्वज्ञ झेंजी निओ यांनी व्यक्त केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद ‘इयर ऑफ धम्म दीक्षा क्रांती बाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या कार्यक्रमाकरिता आले असता ते बोलत होते. जगामध्ये भेदभाव दूर करून समता व बंधुता स्थापन करण्यासाठी आपल्या सर्वाना मिळून काम करण्याची गरज आहे. धर्मामधील असलेली दरी दूर झाल्यावरच ते शक्य आहे. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या घटनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे यंदाचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला विशेष महत्त्व असून दीक्षाभूमीला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे.

संपूर्ण जग बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माबद्दल जगातील अनेक देशांमध्ये प्रसार वाढत असल्याचेही निओ यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पॅरा ऑलम्पिकमधील खेळाडूंना सुद्धा बौद्ध तत्त्वज्ञानामुळे लढण्याचे बळ मिळाले. मी स्वत खेळाडूंची भेट घेऊन त्यांना सहकार्य केल्याचेही निओ म्हणाले. पत्रकार परिषदेला अमेरिकेतील हारवर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. क्रिस्टोफर क्विन, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन अमेरिकेचे अध्यक्ष डॉ. राजू कांबळे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्रा, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेकण उपस्थित होते.

बौद्धाच्या मार्गाने भेदाभेद मिटू शकते – प्रा. क्रिस्टोफर क्विन

भारतातील जाती व्यवस्थेमुळे भेदभावाचे प्रमाण जास्त फोफावले होते. ते दूर करण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन करून मोठी चळवळ उभारली. ती पुढे जाण्याची जबाबदारी सर्व सुशिक्षित व जबाबदार नागरिकांची आहे. माणसाला केवळ माणूस म्हणून बघणे, प्रत्येकाला समान अधिकार मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी जीवन खर्ची घातले. त्यामुळेच आज दलित वर्ग सन्मानाने जगत आहे. केवळ भारतातच नव्हे अमेरिका सारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशातही लोकांसोबत भेदभाव होत असल्याचे दिसते. त्यामुळे बौद्धांच्या शांतीच्या मार्गाने या सर्व समस्यांचे उत्तर आपण मिळवू शकतो, असे मत प्राध्यापक क्रिस्टोफर क्विन यांनी व्यक्त केले.