नागपुरातील केंद्राला अद्याप सूचनाच नाही

नागपूर : देशातील नोएडा, पटणा, हैदराबाद, नागपूर या चार केंद्रावर भारत बायोटेकद्वारा निर्मित कोव्हॅक्सिन लसींची लहान मुलांवरील चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्यात नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयातील केंद्रावर १२ ते १८ वयोगट व दुसऱ्या टप्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांना लसीची पहिली मात्रा दिली गेली. परंतु अद्याप २ ते ६ वयोगटाच्या चाचणीबाबत या केंद्राला काहीही सूचना नसल्याने ही चाचणी सुरू होणार कधी, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर करोनाचा जास्त परिणाम होण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेसह देशातील आरोग्य यंत्रणांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे नागपूरसह देशभऱ्यात लहान मुलांवर तातडीने उपचाराची यंत्रणा उभारली जात आहे.  दुसरीकडे भारत बायोटेकद्वारा लहान मुलांवरील  चाचणीचा शुभारंभ झाल्याने त्याला जास्तच महत्व आले आहे. नागपुरातील केंद्रावर पहिल्या टप्यात १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांना ६ जूनला या लसीची पहिली मात्रा दिली गेली. दुसऱ्या टप्यात ६ ते १२ वयोगटातील २५ मुलांना लसीची पहिली मात्रा दिली गेली होती. या मुलांना दुसरी मात्रा २८ दिवस पूर्ण होताच दिली जाणार आहे.

अद्याप लस दिलेल्या एकही मुलांमध्ये अनुचित प्रकार बघायला मिळाला नसल्याची माहिती या चाचणीचे प्रमुख व सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली. त्यातच तिसऱ्या टप्यात २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची पहिली मात्रा दिली जाणार होती. परंतु अद्यापही भारत बायोटेकसह संबंधित यंत्रणेकडून लसीकरण केंद्राला सूचना आली नाही. त्यामुळे या मुलांवरील चाचणी कधी सुरू होणार,  हे सांगता येत नसल्याचे डॉ. खळतकर यांनी सांगितले. त्यात करोनापासून वाचण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी मार्ग असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मुलांवर लसीकरण कधी सुरू होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

१०० ते १५० मुलांना लशींची मात्रा

देशातील चार शहरातील लसीकरणासाठी निवडलेल्या केंद्रांवर २ ते ६, ६ ते १२, १२ ते  १८ या तिन्ही गटातील ५२५ मुलांना लस दिली जाईल. त्यातील नागपूरच्या वाटय़ाला १२५ ते १५० लस येण्याचा अंदाज नागपुरातील लसीकरण केंद्राकडून वर्तवला जात आहे.