नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘स्टेटस ऑफ स्मॉल कॅट-इन द टायगर लँडस्केप ऑफ इंडिया’ अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल भारतातील वाघांच्या अधिवासात आढळणाऱ्या नऊ लहान जंगली मांजरांच्या प्रजातींचे पहिलेच देशव्यापी मूल्यांकन आहे.
२०१८ आणि २०२२ मध्ये आयोजित व्याघ्रगणनेच्या अभ्यासातील तपशिलावर आधारित हा अभ्यास आहे. २०१८ ते २०२२ दरम्यान देशातील १८ राज्यांमध्ये ५७ हजारांहून अधिक कॅमेरा ट्रॅप स्थानांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात लहान जंगली मार्जार कुळातील प्रजातींची एकूण २४ हजार ८०० छायाचित्रे टिपली गेली. या सर्व छायाचित्रांच्या अभ्यासातून १७ हजार लहान जंगली मार्जार कुळातील प्रजातींची वैयक्तिक ओळख पटवण्यात आली. या तपशिलामुळे संशोधकांना जंगली मांजर, वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट), बिबट मांजर(लेपर्ड कॅट), मासेमारी मांजर (फिशिंग कॅट) आणि इतर प्रजातींच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्याची परवानगी मिळाली. यात जंगली मांजरीची संख्या (जंगल कॅट) वाढलेली दिसून आली. अंदाजे ९६ हजार २७५ चौरस किलोमीटर एवढे तिचे अधिवास क्षेत्र आढळले. याउलट वाघाटीचे(रस्टी स्पॉटेड कॅट) अधिवास क्षेत्र जास्त असूनही २०१८ आणि २०२२ या दोन्ही गणनेदरम्यान त्यांची संख्या कमी झालेली दिसून आली.
ओलसर जंगलात आढळणाऱ्या बिबट मांजरचे (लेपर्ड कॅट) अधिवास क्षेत्र ३२ हजार ८०० चौरस किलोमीटर इतके नोंदवले गेले. हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य भारत आणि सुंदरबन व पश्चिम घाटात ती आढळली. यापूर्वी ज्या अधिवास क्षेत्रात तिचा आढळ होता, त्यापैकी जवळपास अर्ध्या भागात तिची उपस्थिती आढळली.
वाळवंटातील मांजर (डेझर्ट कॅट) प्रामुख्याो पश्चिम आणि मध्य भारतातील कोरड्या व अर्ध शुष्क प्रदेशात १२ हजार ५०० चौरस किलोमीटरमध्ये आढळली. पाणथळ जागा आणि खारफुटीच्या अधिवासांवर अवलंबून असलेली मासेमारी मांजर तराई आर्क, ईशान्य आणि किनारी प्रदेशात ७ हजार ५७५ चौरस किलोमीटरमध्ये आढळली. क्लाउडेड लेपर्ड, मार्बल्ड मांजर आणि एशियाटिक गोल्डन मांजर या तीन प्रजाती प्रामुख्याने ईशान्य भारतातील जंगलांपुरत्या मर्यादित होत्या. प्रत्येकी ४ हजार चौरस किलोमीटरपेक्षा कमी त्यांचे अधिवास क्षेत्र होते. आधी आढळ असलेल्या ७५ टक्क्यांहून अधिक भागांत मार्बल्ड मांजर आणि एशियाटिक गोल्डन मांजर आढळले नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या तर कमी होत नाही ना, असाही अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. बहुतेक संरक्षित क्षेत्रांमध्ये लहान जंगली मांजरी आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्या संरक्षणात अभयारण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे या अभ्यासात नोंदवण्यात आले.
महाराष्ट्रात रानमांजर, वाघाटी आणि ‘लेपर्ड कॅट’
महाराष्ट्रात रानमांजर, वाघाटी आणि ‘लेपर्ड कॅट’ची नोंद करण्यात आली आहे. राज्यात १९९०च्या दशकात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘डेझर्ट कॅट’चीदेखील नोंद आहे. मात्र, आता ही प्रजात राज्यात आढळत नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘लेपर्ड कॅट’च्या अधिवास क्षेत्राच्या विस्तारात वाढ झाल्याचेही या अहवालाच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे.
अशा आहेत नऊ प्रजाती
या अभ्यासाच्या माध्यमातून भारतातील व्याघ्र प्रकल्पामधून कॅराकल (शशकर्ण), फिशिंग कॅट (मासेमार मांजर), गोल्डन कॅट (सोनेरी मांजर), मारबर्ल्ड कॅट, लेपर्ड कॅट, क्लाऊडेड लेपर्ड, रस्टी स्पोटेड कॅट (वाघाटी), वाइल्ड कॅट (जंगली मांजर) आणि डेझर्ट कॅट अशा नऊ प्रजातींची नोंद करण्यात आली.