चंद्रपूर : विद्युत जनित्रमधील (जनरेटर) बिघाडामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा ५०० मेगावॉट क्षमतेचा नववा संच शुक्रवारी कार्यान्वित करण्यात आला. सध्या या संचातून ३२५ ते ४०० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. या संचाच्या दुरुस्तीवर किमान ६५ कोटींपेक्षा अधिकचा खर्च झाला असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राची स्थापित क्षमता २९२० मेगावॉट आहे. मात्र, ११ जानेवारीला जनित्रमध्ये स्फोट झाल्याने ५०० मेगावॉटचा नववा संच बंद पडला. तेव्हापासून शुक्रवारपर्यंत हा संच बंद होता.संचाच्या दुरुस्तीसाठी महानिर्मितीचे अभियंता आणि तंत्रज्ञ ‘भेल’च्या मदतीने परिश्रम घेत होते. अखेर त्यांना यश आले, अशी माहिती चंद्रपूर वीज केंद्राचे अधीक्षक अभियंता महेश राजुरकर यांनी दिली. संचाचे काही भाग ‘भेल’ येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले होते.
कार्यकारी संचालक राजेश पाटील, पंकज सपाटे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, अक्षीक्षक अभियंता राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी हा संच पूर्ववत सुरू करण्यात आला. सध्या या संचातून ३०० पेक्षा अधिक मेगावॉट वीज निर्मिती सुरू असल्याची माहिती राजुरकर यांनी दिली. संच सुरू होताच वीज केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिष्ठान्न वाटप करून आनंद साजरा केला. प्राथमिक माहितीनुसार, संचाच्या दुरूस्तीवर ६५ कोटींच्या जवळपास खर्च झाला आहे.