केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अघळपघळ तसेच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध. त्यांचे भाषण म्हणजे माध्यमांसाठी मेजवानीच असते. ते एकदा बोलायला लागले की कुणाचा मुलाहिजा सुद्धा बाळगत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचे लक्ष असते. हे बोलणारे गडकरी आता लिहिते झाले आहेत. अर्थात त्यांना लेखक वगैरे व्हायचे नाही पण आपणही एखादे पुस्तक लिहावे असे त्यांना वाटले व ती कृती प्रत्यक्षात उतरली सुद्धा! त्यामुळे त्यांच्या या नव्या मोहिमेची दखल घेणे क्रमप्राप्त. तर लिहिते होण्यासाठी गडकरींनी निवड केलीय ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच वाजतगाजत प्रकाशित झाले. बघता बघता त्याच्या तीन आवृत्त्यासुद्धा संपल्यात. तशी अलीकडे संघावर बरीच पुस्तके येऊ लागलीत. मात्र गडकरींचे पुस्तक जरा ‘हटके’ आहे. जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून मिरवणारा संघ नेमका कसा काम करतो? संघ व त्यांच्या परिवारात काम करणाऱ्या ३६ संघटना, त्यात कार्यरत असलेले लाखो कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्यात समन्वय कसा साधला जातो, इतक्या मोठ्या संख्येत लोक एकत्र येऊनही त्यांच्यात वाद का उद्भवत नाही, त्यामागची कारणे काय? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न गडकरींनी यातून केला आहे. म्हटले तर हे पुस्तक ‘रोचक’ आहे पण काही ठिकाणी गडकरी हातचे राखून सांगताहेत की काय अशी शंका मनी उत्पन्न करणारे आहे. अर्थात या स्तंभात या पुस्तकाची समीक्षा करायची नाहीच. फक्त त्याची ओळख करून द्यायची.

व्यवस्थापनशास्त्राचे तीन घटक असतात. काय करायचे याची स्पष्टता, त्यासाठी लागणारे तंत्र व लागणारे मनुष्यबळ. संघ याच सूत्रानुसार चालतो पण बिनपगारी. कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रत्येक जण या शास्त्राचा अवलंब करत पुढे जात असतो असे गडकरींचे म्हणणे. संघाविषयी समजापेक्षा गैरसमजच अधिक पण या संघटनेचा चेहरा मानवी होता, आहे व राहील हे ते ठासून सांगतात. संघात कोणतीही संकल्पना कुणी मांडली तर त्यावर भरपूर मंथन होते, मग आराखडा तयार होतो व शेवटी त्याला अंतिम रूप दिले जाते. हे सांगतानाच गडकरी उदाहरणे देण्याचा मोह टाळतात. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे आधी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नंतर त्यांनी संघ स्थापन केला तेव्हा त्यांच्या घरी झालेल्या पहिल्या बैठकीत केवळ १७ लोक उपस्थित होते. स्थापना झाल्यावर संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही हा आक्षेप खोडून काढताना गडकरी ज्यांनी या लढ्यात भाग घेतला त्यांची आजची अवस्था काय व संघाची आजची स्थिती काय अशी प्रश्नार्थक टिप्पणी करतात. ‘चले जाव’ चळवळीत संघ होता व अनेक भूमिगत काँग्रेस कार्यकर्त्यांना संघ स्वयंसेवकांनी आश्रय देण्याचे काम केले असा दावा गडकरी करतात.

संघात विचार, अधिष्ठान, कार्यकर्ता, कार्यपद्धती, संघटनकार्ये व सातत्य या सूत्रानुसारच काम केले जाते म्हणून संघ मोठा झाला असे ते आवर्जून नमूद करतात. संघात कुणावरही सोपवली जाणारी जबाबदारी ही दायित्वाच्या भूमिकेतून सोपवली जाते. इतर अनेक संस्थांमध्ये वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या संसाधनाचे महत्त्व काळानुरूप कमी होत गेले, मात्र संघात मनुष्यबळाचे महत्त्व आजही अबाधित आहे. संघात पदे, जबाबदारी हा व्यवस्थेचा भाग असला तरी कुणीही कुणाला हा लहान, तो मोठा असे कधीच समजत नाही. संघात एखादा स्वयंसेवक नाराज झाला तर त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाते. कुणी संसार किंवा अन्य व्यावहारिक अडचणींमुळे निष्क्रिय झाले असेल तर त्याच्याशी सतत संपर्क ठेवला जातो. तो का निष्क्रिय झाला असा प्रश्न कधीच न विचारता पुन्हा काम करता का असाच प्रस्ताव ठेवला जातो. समोरच्याने नाही म्हटले तरी त्याचा राग वा द्वेष केला जात नाही असे गडकरी म्हणतात. भारतीयांच्या व्यक्तिमत्त्वाची चार वैशिष्ट्ये आहेत. उपासना पद्धत कोणतीही असली तरी सर्वजण ईश्वर वा अंतिम सत्याकडे जाणारे, एकतेची अनुभूती जोपासणारे, उदारमतवादी आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्त्व पाळणारे. संघाची रचना नेमकी याच वैशिष्ट्यांवर आधारलेली आहे. कुणाला भय दाखवणे वा स्वत: भयभीत होणे या वाटेने संघ कधी गेला नाही म्हणून तो मोठा झाला असा दावा गडकरी करतात. या दाव्याच्या पुष्ट्यार्थ ते संघाची प्रार्थना सुद्धा हीच वैशिष्ट्ये सांगणारी आहे अशी जोड देतात. गडकरींवर स्वामी विवेकानंदाचा प्रभाव आहे. त्यामुळे पुस्तकात त्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या विचाराचे दाखले दिले आहेत. माणुसकी हाच धर्म व सेवा हाच अध्याय हेच संघाचे सूत्र आहे असे सांगताना या संघटनेने स्वत:च्या शक्तीचा वापर कधीही विरोध वा प्रतिकार करण्यासाठी केला नाही असे आवर्जून नमूद करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या शंभर वर्षात संघावर तीनवेळा बंदी लादली गेली पण त्याविरुद्ध संघ कधी रस्त्यावर उतरला नाही. गांधींचा खून झाल्यावर जी बंदी लादली गेली तेव्हाही गोळवलकरांनी शांत राहा, प्रतिकार करू नका असेच सांगितले ही आठवण ते नमूद करतात. गुरुजींच्या प्रयत्नामुळेच जम्मू काश्मीरचे विलीनीकरण भारतात झाले असा दावा गडकरी करतात. पहिल्या बंदीनंतर लोकशाही व्यवस्थेत बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ हवे हे लक्षात आल्यावर जनसंघाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला अशी पक्षजन्माची कथा ते सांगतात. संघात कुणीही व्यक्ती गुरू नाही. संघाचा भगवा ध्वज हाच सगळ्यांचा गुरू असे सांगतानाच नव्या सरसंघचालकाचे नाव विद्यमानाने त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवण्याची प्रथा संघात होती. हेडगेवार व गोळवलकरांनी तेच केले पण देवरसांनी मात्र ही परंपरा मोडली. त्यांनी त्यांच्या हयातीतच राजेंद्रसिंहांचे नाव सुचवले. रेशीमबागच्या स्मृती मंदिर परिसरात हेडगेवारांची समाधी आहे. नंतर गोळवलकर सरसंघचालक असताना त्यांनी माझी समाधी बांधायची नाही असे निक्षून सांगितले. असा पायंडा पडला तर हा परिसर समाधीस्थळ होईल अशी भीती ते बोलून दाखवायचे अशी आठवण गडकरी सांगतात. त्यांचा सर्वात जवळचा संबंध आला तो देवरसांशी. आणीबाणीच्या काळात तरुण भारताची आर्थिक स्थिती वाईट असताना देवरसांनी मुदत ठेवी मोडून पैसे कसे दिले, त्यांची वडिलोपार्जित शेती त्यांनी घरगड्याला कशी दिली, खापरीच्या रुग्णालयासाठी जागा कशी घेऊन दिली अशा दातृत्वाच्या कथा त्यांनी पुस्तकात नमूद केल्या आहेत. तेव्हा अभाविपत असलेल्या गडकरींनी होळीच्या दिवशी एका प्राध्यापकाच्या घरासमोर जाऊन बोंब ठोकली. त्यावरून देवरस कसे रागावले. नंतर राजकारणात आल्यावर त्यांची कार विकत घेऊन मी कसा प्रवास केला अशा अनेक आठवणी त्यांनी यात जागवल्या आहेत. गडकरींच्या नजरेतला संघ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचकांच्या अपेक्षा बऱ्यापैकी पूर्ण करते.