नागपुरात कबुली; मल्यांची बाजू नव्हे तर बेरोजगारांसाठी प्रयत्न
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात निघून गेलेले उद्योगपती विजय मल्या यांची ‘किंगफिशर एअरलाईन्स’ ही विमान कंपनी बंद पडू नये म्हणून आपण तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती, अशी माहिती भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात दिली. या भेटीचा उद्देश हा मल्यांची बाजू घेणे नव्हता तर कंपनी बंद पडल्यास बेरोजगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा होता असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देशातील गरीबी दूर करायची असेल तर रोजगार वाढायला हवा व रोजगार वाढवायचा असेल तर विविध क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढायला हवी, असे सांगताना त्यांनी त्यांच्या भाषणात सध्या देशभर गाजत असलेल्या विजय मल्याच्या विषयाला हात घातला. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना किंगफिशरच्या संदर्भात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना भेटलो होतो. ही कंपनी बंद पडू नये, अशी विनंती केली होती. यावर मुखर्जी यांनी ‘तुम्ही अशी विनंती का करता’ अशी विचारणाही केली होती. कंपनी बंद पडल्यास तेथे काम करणाऱ्या कर्मचारी बेरोजगार होतील, असे आपण त्यांना सांगितले होते, असे गडकरी म्हणाले. कर्ज बुडविले म्हणून आज मल्यावर देशभर टीका केली जात आहे, मात्र याच मल्याने घेतलेल्या कर्जावरील व्याजामुळे बँका नफ्यात आल्या होत्या, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले असेल तर कर्ज थकविणाऱ्याला गुन्हेगार ठरविणे चुकीचे आहे. अशाचप्रकारे आपण नागपूरची एम्प्रेस मिल बंद पडू नये म्हणून रतन टाटांची भेट घेतली होती, असेही त्यांनी सांगितले. हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याने विजय मल्यांवर टीका होत आहे, या पाश्र्वभूमीवर गडकरी यांनी त्यांच्या कंपनीसाठी तत्कालीन अर्थमंत्र्यांची भेट घेण्याची बाब सार्वजनिकपणे जाहीर करणे यावरून वादंग माजण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari kingfisher airlines
First published on: 26-03-2016 at 02:13 IST