scorecardresearch

Premium

..अन् नितीन राऊत अर्ज न भरताच परतले

रामटेकहून लढण्याची राऊत यांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी केली होती.

नितीन राऊत
नितीन राऊत

रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रसेचे अधिकृत उमेदवार किशोर गजभिये यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी  रामटेकमधूनच स्वत:च अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना पक्षाचे अधिकृत पत्रच प्राप्त झाले नाही.

पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, असा दावा राऊत समर्थकांनी केला, तर राऊत यांचा हा प्रयत्न  पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकण्यासाठी केलेला बनाव तर नाही ना, अशी शंका राऊत विरोधकांनी व्यक्त केली आहे.

रामटेकहून लढण्याची राऊत यांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत रामटेकच्या उमेदवारीचा तिढा सुटला नव्हता. रविवारी सायंकाळी काँग्रेसने किशोर गजभिये यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राऊत नाराज झाले. मात्र, ते सोमवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार किशोर गजभिये यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत आमदार सुनील केदार देखील होते. गजभिये यांनी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास अर्ज दाखल केला. यानंतर नितीन राऊत आणि आमदार केदार हे जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर थोडय़ाच वेळात पुन्हा राऊत आणि केदार काही कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात परतले.

दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेले. अध्र्या तासाने बाहेर पडले. मात्र, त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

नितीन राऊत यांना दिल्लीतून अर्ज दाखल करण्याची सूचना करण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. पण पक्षाची उमेदवारी भरताना पक्षाचे अधिकृत पत्र सोबत (ए व बी फॉर्म) जोडावे लागते. हे पत्रच त्यांना वेळेत मिळाले नाही. परिणामी अर्ज दाखल करता आला नाही.

रामटेक (राखीव) मतदारसंघातून मुकूल वासनिक हे इच्छुक होते. पण स्थानिक आमदार सुनील केदार यांच्यासह अन्य नेत्यांनी विरोध दर्शविल्याने वासनिक यांचा पत्ता कापला गेला. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्यास नितीन राऊत यांनाही मिळू नये, असे प्रयत्न वासनिक यांनी केले.

दिल्लीत वजन वापरून वासनिक यांनी गेल्या वेळी नितीन राऊत यांच्या विरोधात बसपामधून लढलेल्या किशोर गजभिये यांना उमेदवारी मिळवून दिली. गजभिये यांच्या उमेदवारीस राऊत यांचा विरोध होता. वासनिक विरुद्ध राऊत वादात गजभिये यांना उमेदवारी मिळाली.

नितीन राऊत यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याकडे पक्षाचा ए.बी. फॉर्म नव्हता. ए.बी. फॉर्मबाबत असलेल्या नियमांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर ते अर्ज दाखल न करता परत गेले.

– अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी नागपूर</p>

केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक झाली. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने यादी जाहीर झाली. त्यात रामटेकचे उमेदवार म्हणून किशोर गजभिये यांचे नाव आहे. त्यामुळे गजभिये  हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी अर्ज भरला आणि त्यावेळी नितीन राऊत सोबत होते. नितीन राऊत यांनी अर्ज भरलेला नाही. त्यांना कोणी फोन केला. काय बोलणे झाले. याबद्दल काही कल्पना नाही.

– अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ता, काँग्रेस</p>

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin raut returned without completing the application

First published on: 26-03-2019 at 01:23 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×