वन्यजीव बचाव केंद्राच्या रचनेत अनेक त्रुटी

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील बचाव केंद्राचे उद्घाटन मोठय़ा थाटामाटात झाले, पण या केंद्रात वन्यप्राण्यांच्या देखभालीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या वन्यप्राण्याला आल्यापावलीच परतण्याची वेळ आली. या केंद्राच्या एकूणच रचनेत इतरही अनेक त्रुटी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या वन्यप्राण्याच्या भवितव्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बहुप्रतीक्षित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्णत्वास यायचा असला तरी बचाव केंद्र आणि सफारीच्या माध्यमातून हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. बचाव केंद्रात  वन्यप्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. २० बिबट, १० वाघ आणि १० अस्वल राहू शकतील, अशी व्यवस्था आहे. अधिवेशन काळात उद्घाटन करायचे म्हणून या ठिकाणी चंद्रपूर वनक्षेत्रातून बिबट आणण्यात आले. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी या बिबटय़ांना मांस टाकण्यात आले. बिबटय़ांनी ते फस्त केल्यानंतर उरलेले मांस उचलण्यासाठी आणि पिंजऱ्याच्या सफाईसाठी सफाई कर्मचारीच नसल्याने ते मांस तसेच पडून होते. अखेर उद्घाटनाचा दिवस उजाडल्याने ज्या कर्मचाऱ्याच्या अखत्यारित हे काम येत नाही, त्या कर्मचाऱ्यावर मांस उचलून सफाई करण्याची वेळ आली. वास्तविक एका युनिटसाठी देखरेख करणारा, खाऊ घालणारा आणि स्वच्छ करणारा अशा तीन कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या पद्धतीचे शिक्षण असणे गरजेचे आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पिंजरे तयार करण्यात आल्याचे वनविकास महामंडळाचे म्हणणे आहे, पण केवळ एकाच पिंजऱ्याला दार असल्यामुळे दुसऱ्या पिंजऱ्यातून आजारी बिबट उपचारसाठी दरवाजा असलेल्या पिंजऱ्यात आणणे म्हणजे तारेवरची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे.

आजारी वन्यप्राण्यांच्या उपचाराची मदार ‘माफसू’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे, पण उर्वरित वेळेत उपचारासाठी असलेल्या व पिंजऱ्यात असलेल्या वन्यप्राण्यांच्या देखभालीसाठी वनविकास महामंडळाने अजूनपर्यंत कर्मचारीच नियुक्त केले नाहीत. याच कारणामुळे चंद्रपूरहून उपचारसाठी आणलेला अजगर गोरेवाडा बचाव केंद्रात दाखल न करता, त्या अजगराची रवानगी बचाव केंद्रानंतर उद्घाटन झालेल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’मध्ये करण्यात आली.

या संदर्भात वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तांत्रिक आणि वन्यजीवांशी संबंधित निकषांवर आधारित ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’च्या एकूणच रचनेची प्रशंसा वनमंत्र्यांनीही केली. त्यामुळे शहरात एकाचवेळी वन्यप्राण्याच्या उपचारासाठी तयार झालेल्या दोन केंद्रातील फरक अनेकांना जाणवला.