राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण नावापुरतेच
व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील भ्रमंती, वन्यजीव, पर्यटकांची सुरक्षा आणि त्यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे (एनटीसीए) नियम हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. एनटीसीएवर याबाबतचे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याची जबाबदारी सरकारने सोपवली. व्याघ्र प्रकल्प, तसेच अभयारण्यात नियम पाळले जातात किंवा नाही आणि त्यावर कारवाई करायची किंवा नाही याचे अधिकार मात्र एनटीसीएला नाही. भ्रमंतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सीच्या नियमांवरून असाच एक मुद्दा उपस्थित झाला असून, एनटीसीए म्हणजे बुजगावणे ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात चार-पाच दिवसांपूर्वी भ्रमंतीदरम्यान पर्यटकांच्या जिप्सीजवळ वाघाने ठाण मांडले. जिप्सीचालकाने जिप्सी वाघाच्या जवळ नेल्यामुळे वाघानेही काही मिनिटे जिप्सीच्या आरशासोबत खेळण्यापासून, तर जिप्सीतील पर्यटकांजवळ जाण्यापर्यंत मजल गाठली. यात पर्यटकांना कोणतीही इजा वाघाने केली नाही आणि थोडय़ा वेळाने तो निघूनही गेला. त्यावरून सध्या संपूर्ण राज्यातच खळबळ उडाली. अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पातील भ्रमंतीचे नियम प्रशासनाकडून सर्रास तोडले जात आहेत. मुळातच यासंदर्भातील संपूर्ण नियमावली, मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी एनटीसीएवर आहे. नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार त्यांना नाही. केंद्राने व राज्याने हे अधिकार स्वत:कडे राखून ठेवले आहेत. पर्यटनावरच सरकारने अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे वन्यजीवांची सुरक्षा डावलून एनटीसीएने तयार केलेल्या नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन करण्याचा प्रकार गेल्या पाच-सहा वर्षांंपासून सुरू आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने हे सिद्ध केले आणि आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातसुद्धा तीच परिस्थिती उद्भवली. जिप्सीची उंची आणि इतर बाबींवर खल सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत पर्यटकांना जंगलात भ्रमंती घडवून आणणाऱ्या जिप्सींचे निकष पाळले जातात. तेथील जिप्सीची उंची अधिक असून, त्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच तयार करण्यात आल्या आहेत. देशातही बंद जिप्सी वापरण्यासंदर्भातील नियम एनटीसीएने २००७ मध्ये तयार केले होते.
जिप्सी जाळ्यांविनाच
बांधवगड व्याघ्र प्रकल्पात दशकभरापूर्वी पर्यटक जिप्सीवर वाघाने हल्ला केल्याने पर्यटक जखमी झाले. त्यानंतर जंगलात फिरणाऱ्या सर्व जिप्सींना जाळी असावी, असा नियम तयार करण्यात आला, मात्र महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात कुठेही या नियमाचे पालन केले गेले नाही. सर्रास खुल्या जिप्सी पर्यटनासाठी वापरल्या जातात. निसर्ग पर्यटनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वन्यप्राणी आणि जिप्सी यांच्यात २० मीटरचे अंतर असावे, तसेच कोणतेही वाहन १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ वन्यजीवांजवळ थांबू नये, असे नमूद आहे. मात्र, कुठेही हा नियम पाळला जात नाही.