बुलढाणा: आमचा पक्ष भाजपाची ‘बी टीम’ नसून यंत्रणांच्या धाकापायी भाजपला शरण गेलेले शिंदे गट, अजित पवार गट सारखे पक्ष अथवा नेते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची ‘बी टीम’ असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबिन खान व दानिश शेख यांनी केले आहे. राजकारणात कायम गाजत असलेल्या ‘बी टीम’ ची वेगळी व्याख्या करतानाच त्यांनी ‘एआयएमआयएम’ देखील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.

स्थानिय पत्रकार भवनात माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महायुती आणि आघाडी काही वेगळे नसून दोघा पक्षाना मुस्लिम व दलित समुदायाबद्दल काहीच देणे-घेणे नाहीये. या दोघांनी राज्यात लक्षणीय संख्येत असलेल्या मुस्लिम समाजाला ४८ पैकी एकाही जागी उमेदवारी न देणे ,ही बाब सिद्ध करणारी आहे.

आणखी वाचा-छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

बुलढाणा मतदारसंघातील युती, आघाडीचे उमेदवार व दोन प्रमुख अपक्ष मराठा समुदायाचे आहेत. यामुळे आम्ही उपेक्षित मुस्लिम व दलित समाजाची मोट बांधून जागा लढविणार आहे. बुधवारी पार पडलेल्या पक्षाच्या जिल्हा बैठकीत बुलढाणा लोकसभा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षश्रेष्ठींना मोबिन खान, दानिश शेख व अन्य एक मिळून तीन उमेदवारांची नावे पाठविण्यात आली. यातील एका नावाची घोषणा आज उद्या करणार असल्याचे डॉ खान यांनी स्पष्ट केले.