राजकीय पुढाऱ्यांच्या संपर्कात; ४० जणांच्या टोळीसह माथनकरचा बडवईंच्या घरात घुसखोरी, साहित्याची तोडफोड
घर रिकामे करण्यासाठी एका व्यक्तीला धमकविण्याच्या गुन्ह्यात ‘डॉन’ संतोष आंबेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली, तेव्हापासून तो फरार असून राजकीय दबाव वापरून ‘मोक्का’ रद्द करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळत आहे.
युवराज ठुनिया माथनकर (३५, रा. बेलतरोडी) हा १८ जानेवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास आपल्या ३० ते ४० जणांसोबत स्वप्नील सुरेश बडवई (१९, रा. गजानन धाम, सहकारनगर) यांच्या घरात शिरला होता. यावेळी त्यांनी स्वप्नील यांना घर रिकामे करण्यासाठी ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्यांनी स्वप्नील यांच्या घराची तोडफोडही केली.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी २७ जानेवारीला प्रकरणातील आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ लावला. या टोळीचा म्होरक्या संतोष आंबेकर असून त्याच्याविरुद्धही ‘मोक्का’ लावण्यात आला. आतापर्यंत युवराज माथनकर, सचिन जयंता अडुळकर (३०, रा. दिघोरी), विजय मारोतराव बोरकर (३५, रा. दिघोरी) आणि लोकेश कुलटकर यांना अटक केली आहे. तर गौतम भटकर, संजय फातोडे, आकाश बोरकर, विनोद मसराम, प्रकाश मानकर, शक्ती मनपिया आणि टोळीचा म्होरक्या संतोष आंबेकर व इतर फरार आहेत.
पोलिसांनी आपल्याविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केल्याची माहिती मिळताच संतोष आंबेकर हा फरार झाला. सर्वप्रथम या प्रकरणात काय करता येऊ शकते? यासाठी कायदेशीर सल्ला घेतला. ‘मोक्का’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला अटकपूर्व जामीन किंवा जामीन अर्ज करता येत नाही. त्यामुळे त्याच्याकडे राज्य सरकारमार्फत ‘मोक्का’ रद्द करविणे हाच पर्याय उरला. पोलिसांनी लावलेला ‘मोक्का’ रद्द करण्याचे सरकारला अधिकार आहेत. त्यामुळे आंबेकर सर्व राजकीय पाठबळ वापरण्यासाठी दिल्लीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
या ठिकाणी एका केंद्रीय मंत्र्यांमार्फत आंबेकर हा राज्य सरकारवर दबाव टाकून ‘मोक्का’ रद्द करविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या प्रयत्नात त्याला कितपत यश मिळते, हे येणारा काळच ठरवेल.
आंबेकरची अटक नको
गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम नागपूर पोलीस राबवित आहेत. आरोपी सहज सापडत असेल तर त्याला अटक करणे, आरोपी जेवढे दिवस फरार राहील तेवढाच त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्याला बळकटी मिळेल, शिवाय गुन्हेगार शहराच्या बाहेर असल्याने गुन्हेगारीत घट होते, त्यामुळे नागपूर पोलीस आंबेकरची अटक टाळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.