करोना काळात ‘रेबिज’ची रुग्णसंख्या घटली!

जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या टाळेबंदी व र्निबधामुळे नागरिक तुलनेत कमी संख्येने रस्त्यांवर होते.

(संग्रहित छायाचित्र)
  • प्राण्यांनी चावा घेतलेले मेडिकलमधील रुग्णही घटले – जागतिक रेबिज दिन विशेष

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या टाळेबंदी व र्निबधामुळे नागरिक तुलनेत कमी संख्येने रस्त्यांवर होते. त्यामुळे मेडिकल रुग्णालयात नेहमीच्या तुलनेत कमी संख्येने मोकाट कुत्र्यांसह जनावरांनी चावलेले रुग्ण उपचाराला आले. तर मेडिकलला मृत्यू संख्याही घटल्याचे येथील आकडेवारीवरून दिसत आहे. मंगळवारी जागतिक रेबिज दिन असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

नागपूर जिल्ह्य़ात करोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळला. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्च २०२० मध्ये कडक टाळेबंदी लावली. त्यानंतर काही महिन्यांनी कमी-अधिक प्रमाणात र्निबध शिथिल केले जात होते. तर करोनाची पहिली लाट ओसरल्यावर र्निबध बरेच शिथील झाले.

परंतु त्यानंतर करोनाची दुसरी लाट आल्यावर पुन्हा र्निबध लावले गेले. या कडक टाळेबंदी व र्निबधामुळे या काळात रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असल्याने मोकाट श्वानांसह प्राण्यांनी चावा घेतल्याचे कमी रुग्ण निघाले. त्यामुळे मेडिकलला २०१९ मध्ये रेबिजचे १९ मृत्यू नोंदवले गेले होते. ही संख्या २०२१ मध्ये आजपर्यंत ८ नोंदवली गेली. तर प्राण्यांनी चावा घेतलेले मेडिकलला २०१९ मध्ये २,१७८ रुग्ण उपचाराला आले. ही संख्या २०२१ मध्ये ७२३ आहे.

मेडिकलच्या आकडेवारीनुसार गेल्या अडीच वर्षांत मेडिकलला रेबिजच्या झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू कुत्रे, मांजर यांनी चावा घेतलेली आहेत. तर मृत्यूंमध्ये १५ वर्षे वयोगटातील मुलांचीही संख्या अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात प्रत्येक

वर्षी ६० हजारावर नागरिक दगावतात. पैकी ४० टक्के मृत्यू भारतातील असतात. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर ९७ टक्के जणांना रेबिजही भीती असते. या कुत्र्याच्या लाळेद्वारे हा आजार मानवी रक्तवाहिन्यातून संक्रमित होऊन मेंदूत शिरतो. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा आजार होण्याचा धोका बळावतो. रेबिजचे दोन प्रकार असून ८० टक्के रुग्ण हे क्लासिकल तर २० टक्के रुग्ण पॅरॉसिटिक रेबिजचे आढळतात. क्लासिकल रेबिजच्या रुग्णांमध्ये जखम खाजवणे, पाण्याची भीती वाटणे, पाणी दिसले की, रुग्णांच्या गळ्याचे आणि श्वासनलिकेचे स्नायू आकुंचन पावतात. पॅरॉसिटिक रुग्णाला पाण्याची भीती वाटत नाही. ताप, डोकेदुखी, पायांमध्ये अशक्?तपणा येतो. पक्षघात तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता

असते.

जनावरांनी चावा घेतल्यावर मेडिकलला आलेले रुग्ण

    वर्ष           रुग्णसंख्या

    २०१९          २,१७८

    २०२०          १,३०५

    २०२१           ७२३

प्रतिबंधक लसीकरणाची गरज

‘‘लसीकरणातून रेबिज नियंत्रणात आणणे शक्य आहे. त्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत जनजागृतीसह लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तर या रुग्णांना वेळीच शासकीय रुग्णालयात आणल्यास त्यांच्यावर उपचार करता येते. कुणीही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रुग्ण भोंदू बाबाकडे नेऊ नये.’’

– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल रुग्णालय

रेबिजचा प्रसार हे विषाणू असलेल्या श्वान, मांजर, जंगली पशूंच्या लाळेमार्फत होतो. या प्राण्यांनी कुणालाही चावा घेतल्यास संबंधितांने तातडीने ती जागा साबणाने धुवून घ्यावी. जखमेवर टिंक्चर आयोडिन अथवा डेटॉल लावावे. खोलवर जखम असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावे.’’

– डॉ. समीर गोलावार, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल रुग्णालय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Number of rabies cases decreased during corona period ssh

ताज्या बातम्या