नागपूर: उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल), सुपरस्पेशालीटी, ट्रामा केअर सेंटरमधील परिचारिका मागील पाच दिवसांपासून वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी संपावर आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या मध्य भारतातील गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यातच येथील बाह्यस्त्रोत संवर्गातील स्वच्छता कर्मचारी आणि मदतनीसही संपावर गेल्याने येथील रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

मेडिकल रुग्णालयासह त्याच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालीटी, ट्रामा केअर सेंटरमधील स्वच्छता कर्मचारी आणि मदतनीसाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे नागपूरसह राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये शासनाकडून बाह्यस्त्रोत कंपनीतर्फे स्वच्छता कर्मचारी आणि मदतनीसाची सेवा घेणे सुरू केले गेले. दरम्यान नागपुरातील मेडिकलमध्ये क्रिस्टल कंपनीकडून या कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे. मेडिकलमध्ये सध्या या कंपनीचे ३३७ कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून सेवा देत आहे.

दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना सेवा दिल्यावरही कंपनीकडून वेतन दिले गेले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालवणे कठीन झाल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक संप पुराकला. अचानक झालेल्या संपामुळे मेडिकलमधील स्वच्छतेचे व्यवस्थापनच कोलमडले. ही माहिती अधिकाऱ्यांना कळताच सगळ्यांचे धाबे दणाणले. तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुसरीकडे मेडिकलमधील सगळ्या स्वच्छतेशी संबंधित अधिकाऱ्यांना सेवेवरील स्थायी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिदक्षता विभागासह इतरही महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेचा भार सांभाळण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे सेवेवरील कर्मचाऱ्यांवर कामाचा तान वाढल्याने तेही प्रशासनावर संतापले आहे.

एकीकडे परिचारिकांच्या संपाने मेडिकलमधील अनेक नियोजित शस्त्रक्रिया स्थगित होणेसह इतरही अनेक कामे विस्कळीत झाली आहे. त्यातच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येथील स्वच्छता यंत्रणाली कोलमडली आहे. त्यामुळे मेडिकलमधील रुग्णांचा वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दरम्यान मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्रशासनाने स्थायी कर्मचाऱ्यांना सेवेवर लावण्यासह आवश्यक काळजी घेतल्याचा दावा केला. त्यामुळे सध्या स्वच्छतेची काहीही समस्या नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

अधिष्ठाता कार्यालय परिसरात…

मागील तीन महिन्यापासून क्रिस्टल कंपनीकडून वेतन मिळाले नसल्याने संपावरील बाह्यस्त्रोत कर्मचारी मंगळवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालय परिसरात गोळा झाले. त्यांनी मेडिकलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करत तीन महिन्यापासून वेतन नसल्याने संताप व्यक्त केला.

मेडिकलमधील रिक्त पदांची स्थिती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेडिकल, सुपरस्पेशालीटी, ट्रामा केअर सेंटरमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसह जुने व नवीन अशी २४० च्या जवळपास पदे भरली आहे. तर मदतनीसांचीही जुने व नवीन मिळून ३३० च्या जवळपास पदे भरली आहे. परंतु आताही स्थायी संवर्गातील मंजूरच्या तुलनेत सुमारे दोनशे पदे रिक्त असल्याची माहिती आहे.