वाहनचालक व पक्ष्यांना धोका कायम; कारवाईचा प्रश्न अधांतरीच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकरसंक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर एक महिना आधीपासूनच आकाश पतंगांनी झाकोळण्यास सुरुवात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हा पतंगोत्सव जीवघेणा ठरत चालला आहे. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आणि झाडांवर अडकलेला हा मांजा पक्ष्यांना जखमी करणारा ठरला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनी या मांजावर बंदीची मागणी सुरू केली. या मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही अंमलबजावणीच्या नावावर शून्य आहे. यावर्षीदेखील शहरातील दुकानदारांनी असा मांजा खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या मांजामुळे नागरिकांचे विशेषत: वाहनधारकांचे नाक, कान, गळे चिरण्याच्या घटना गेल्या काही वषार्ंत शहरात पतंगोत्सवाच्या सुमारास घडून येत आहेत. यात पक्षीदेखील मोठय़ा प्रमाणात जखमी होत आहेत. मकरसंक्रांतीनंतर काही महिन्यांनी पावसाळयाच्या सुमारास झाडांवर अडकलेला हा मांजा पक्ष्यांसाठी अधिक घातक ठरत आहे. पक्षी आणि मानवाला होणारा धोका लक्षात घेता राज्य सरकारने त्याच्या विक्रीवर बंदी घातली. पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अनुसार राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांजावर बंदी घालण्यासाठी ‘पेटा’ या संस्थेने याचिका दाखल केली होती. तसेच सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला आवाहन करून मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याचदरम्यान केंद्राच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागालाही यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. हा मांजा विकताना कुणी आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही यात दिले आहेत. मात्र, शहरातील दुकानांमध्ये नायलॉन मांजा आढळून येत असून त्यावर खरोखरच कारवाई केली जाणार का, असा प्रश्न आहे.

सावधानतेचा इशारा

*   पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजासारख्या धोकादायक पदार्थाची विक्री आणि साठवणूक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. नागरिकांनी या मांजाचा वापर टाळावा याकरिता जनजागृती करण्यात यावी, असे नमूद आहे.

*   नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्रीसाठी न्यायालयाने मनाई केल्याने अशी कृती करणाऱ्यांवर भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४४ नुसार कारवाई केली जाई शकते. संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाऊ शकते.

*   नायलॉन मांजाची विक्री करणे कायदेशिरदृष्टय़ा गुन्हा आहे. तसेच मांजाची खरेदी करणेही बेकायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पतंगप्रेमींची त्यातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nylon manja sale continue even after ban
First published on: 04-01-2017 at 03:58 IST