अमरावती : सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. यादरम्यान पृथ्वी कधी सूर्यापासून लांब, तर कधी जवळ असते. ३ जानेवारीला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर सर्वांत कमी १४.७१ कोटी किमी राहील. नेहमी हे अंतर १५ कोटी किमी राहते. या जवळिकीचा जीवसृष्टीवर परिणाम होणार नाही. ही एक खगोलीय घटना असल्याचे खगोलतज्‍ज्ञांनी सांगितले.

पृथ्वी व सूर्यामधील अंतर कमी असणे या खगोलीय घटनेला उपसूर्य म्हणतात. सूर्यावर ज्या भागाचे तापमान कमी होते. त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र पूर्ण झाले आहे. या घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.

हेही वाचा – मजुरांच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटा बदलवण्याचे रॅकेट, ‘दिल्ली ‘कनेक्शन’

अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. अशा घटनांची २०२५ मध्ये रेलचेल आहे. यामध्ये ३ जानेवारीला पृथ्वी व सूर्यादरम्यानचे अंतर कमी आहे. याला ‘पेरेहेंलिऑन’ म्हणतात, तर ४ जानेवारीला शनी ग्रह काही वेळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. या घटनेला खगोलशास्त्रात ‘पिधानयुती’ म्हणतात.

२० जानेवारीला शुक्राजवळ शनी दिसेल, तर २ फेब्रुवारीला शुक्र व चंद्राची युती राहील. ८ फेब्रुवारीला पहाटे नरतुरंग उल्का वर्षाव पाहता येईल. ८ मार्चला पश्चिम क्षितिजावर सायंकाळी बुध ग्रह दिसेल. १४ मार्च रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे भारतातून दिसणार नाही. २० मार्चला दिवस व रात्र सारखीच राहणार आहे.

हेही वाचा – राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ एप्रिल रोजी चंद्राजवळ मंगळ दिसेल. २२ व २३ एप्रिल रोजी उल्का वर्षाव दिसेल. ४ मे रोजी मंगळ व चंद्राची युती राहील. २४ मे रोजी शनी ग्रह काही काळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. २१ जून हा वर्षातला सर्वांत मोठा दिवस म्हणजेच १३ तास १३ मिनिटांचा राहील. ४ जुलै रोजी पृथ्वी व सूर्याचे अंतर जास्त राहील. ४ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ तारा व चंद्र यांची पिधानयुती राहील. या सर्व घटना नैसर्गिक आहेत. या खगोलीय घटनांचे अवलोकन व निरीक्षण करण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.