प्रियकरासोबत लग्नासाठी तरूणीने १० वर्ष वाट बघितली. शेवटी प्रियकराने लग्न करण्यास होकार दिला. मात्र, लग्नाचा दिवस उजाडण्यापूर्वीच नवरदेवाने शहरातून पळ काढला. त्यामुळे चिडलेल्या नववधूने थेट पोलीस ठाणे गाठून नवरदेवावर बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली. राहुल हरिचंद्र तिवारी (३४, रा. वाडी) असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल तिवारी हा इंदूर (म.प्र.) येथील राहणारा आहे. नागपुरात तो वाडी हद्दीत वास्तव्यास होता. आयशर वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय तो करीत होता. त्याच्याच वस्तीत पीडित ३२ वर्षीय तरुणी राहत होती. २००८ मध्ये त्यांची ओळख झाली आणि त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. राहुलने तिला लग्नाचे आमिष दाखविले. राहुलशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या आई-वडिलांना लागली. त्यामुळे त्यांनी तिच्या प्रेमसंबंधास विरोध केला. त्यामुळे तिने आईवडिलांचे घर सोडले. राहुलवर विश्वास असल्याने ती वेगळी खोली भाड्याने करून राहत होती. आईवडिलांना सोडून आलेल्या प्रेयसीवर राहुलने वारंवार अत्याचार केला. त्यातून तिला ६ वेळा गर्भधारणा झाली.

लग्न करण्याचा बहाणा करून त्याने प्रत्येक वेळी गर्भपात करण्यास भाग पाडले. तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्याने शेवटी तो लग्नास तयार झाला. मागील महिन्यात ते लग्न करणार होते. त्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव देखील केली होती. लग्न दोन दिवसांवर आले. प्रेयसीने सर्व तयारी करून ठेवली. हळद लागण्याच्या दिवशी सर्व धार्मिक संस्कार आणि प्रथा आटोपल्या. मात्र, ऐनवेळी राहुलने लग्नास नकार देऊन नागपुरातून पळ काढला.

तरुणीने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे शेवटी तरुणीने वाडी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.