अमरावती : जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून केलेल्या वक्तव्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे वाहन मला दिसले, तर ते वाहन मीच फोडन, पण जो कोणी वाहन फोडेल, त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देईन, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना सुनावले होते. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सारखे फुकट, सारखी माफी असे कसे चालेल, असे विधान केले होते.

सोसायटी काढायची. कर्ज काढायचे, पुन्हा कर्जबाजारी व्हायचे. पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. अनेक वर्ष सुरू आहे, त्याची काही चिंता नाहीये. महायुती सरकारने जाहीरच केले आहे की आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बच्चू कडू म्हणाले, नाव कृष्णाचे आहे, मात्र कृत्य कंसाचे करायचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तर दुसरीकडे वाचाळवीर मंत्री अशी विधाने करतात. लोक त्यांना झोडपत नाहीत, याचे आभार मानले पाहिजे. ही नालायकी आता थांबवा, असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. तसेच मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडणार, असेही ते म्हणाले.

राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भावाची शिफारस केली आणि मोदी सरकारने हमीभाव जाहीर केला ८ हजार रुपये. सरकारला याची लाज वाटली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू हे कर्जमाफीच्या मुद्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू, असे आश्वासन दिल्याने त्यांना आता मागे फिरता येणार नाही. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास एक जुलैपासून राज्यातील एकही रेल्वे धावू देणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. सरकारने आम्हाला गृहीत धरू नये. मागणी मान्य न झाल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, असे ते म्हणाले.