कुलगुरूंच्या आंधळय़ा विश्वासाचा दुष्परिणाम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुन्हा  आंधळा विश्वास टाकल्याचा फटका हिवाळी परीक्षेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ‘एमकेसीएल’कडे असलेल्या प्रथम वर्षांच्या जवळपास दीडशे हिवाळी ऑनलाईन परीक्षांचे निकाल तब्बल ६७ दिवस उलटूनही रखडले आहेत. त्यामुळे सर्वाचा विरोध झुगारून ‘एमकेसीएल’च्या हाती परीक्षा सोपवणाऱ्या कुलगुरूंच्या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांचे काम हे काही वर्षांपासून ‘प्रोमार्क’ कंपनीकडे  होते. त्यामुळे ही कंपनी परीक्षा पूर्व आणि परीक्षा नंतरची सर्व कामे करायची. ‘प्रोमार्क’मुळे विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षा ऑनलाईन झाल्या, मागील पाच वर्षांत विद्यापीठाच्या निकालाची गाडीही रूळावर आली. या कंपनीचे काम सुरळीत सुरू असतानाही कुलगुरूंनी ‘एमकेसीएल’ला प्रथम वर्षांचे काम दिले.  हिवाळी परीक्षा सम-विषम पद्धतीने झाल्या. ‘सम’ सत्रांतमधील अनुत्तीर्ण, माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन घेण्यात आली. ‘विषय’ सत्रांतच्या नियमित, अनुत्तीर्ण, माजी आणि बहि:शाल अशा सर्वच परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन घेण्यात आल्या.

या परीक्षांमध्येही प्रथम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा ‘प्रोमार्क’ने ऑनलाईन  घेतल्या. यातील केवळ एक परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांचे निकालही वेळेत जाहीर करण्यात आले. मात्र, विद्यापीठाचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात नियम असतानाही ‘एमकेसीएल’च्या अखत्यारितील प्रथम वर्षांच्या जवळपास १५० ऑनलाईन परीक्षांचे निकाल ६७ दिवसांपासून रखडले आहेत. ‘एमकेसीएल’च्या अशाच कामचुकारपणामुळे नागपूर विद्यापीठाने चार वर्षांआधी त्यांच्यासोबतच करार रद्द केला होता. त्यामुळे पुन्हा ‘एमकेसीएल’ला विद्यापीठात काम देण्यावरून सर्वाचाच विरोध होता. मात्र, त्यानंतरही कुलगुरूंनी ‘एमकेसीएल’ला परीक्षेचे काम दिले. परंतु, पहिल्याच परीक्षेत ‘एमकेसीएल’चा बोजवारा उडाला आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

एमकेसीएलचा गोंधळ काय?

पहिल्या टप्प्यात ‘एमकेसीएल’ला प्रथम वर्षांचे काम देण्यात आले. मात्र, ‘एमकेसीएल’ स्वत: परीक्षा घेत नसल्याने त्यांनी प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्व माहिती ‘प्रोमार्क’ला पाठवून परीक्षाही ‘प्रोमार्क’ला घ्यायला लावली. त्यानुसार प्रथम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षा ‘प्रोमार्क’ने ऑनलाईन घेत परीक्षेचे गुण ‘एमकेसीएल’कडे सुपूर्द केले. या प्रथम सत्राच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान घेण्यात आल्या. परंतु, ३ मार्चला संपलेल्या या परीक्षेला ६७ दिवस उलटूनही ‘एमकेसीएल’ने निकाल जाहीर केलेला नाही.