नागपूर : विरोधकांना काही काम नसल्याने ते अग्निपथ योजनेबद्दल युवकांना भडकवून वाद निर्माण करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री व माजी लष्कर प्रमुख विजयकुमार सिंह यांनी केला. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. अग्निपथ या योजनेवरून वाद निर्माण झाला असून काही राज्यात हिंसक आंदोलन सुरू आहेत. याबाबत व्ही.के. सिंह यांना विचारले असता त्यांनी या हिंसक आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडले. ते म्हणाले, विरोधी पक्षाकडे दुसरे काही काम नाही. त्यामुळे ते योजनेची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच त्याबाबत वाद निर्माण करीत आहेत. लोकांना चुकीच्या गोष्टी सांगून चिथावणी दिली जात आहे. संरक्षण दल मोठय़ा प्रमाणात नोकरी देण्याचे माध्यम कधी नव्हते. येथे भरती होताना अनेक अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात.

सरासरी ४० ते ४५ युवकांपैकी केवळ एक उमेदवार सैन्यदलात निवडला जातो. त्यामुळे अग्निपथमध्ये ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यातील २५ टक्के उमदेवारांना कायम केले जाईल. उर्वरित ७५ टक्के युवकांना चांगले आर्थिक पॅकेज मिळेल. शिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने इतर सेवांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा या योजनेवरून वाद उरतोच कुठे, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

प्रशांत किशोर यांची टीका

पाटणा : केंद्राने लष्करभरतीसाठी नव्याने जाहीर केलेल्या अग्निवीर योजनेच्या विरोधात उसळलेल्या निदर्शनांवरून बिहारमधील सत्तारूढ आघाडीतील भाजप आणि जनता दल-युनायटेड यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याबद्दल निवडणूक  रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.

* बिहार जळत असताना हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याची किंमत जनतेला मोजावी लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी भाजप-जदयु एकमेकांशी भांडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या योजनेविरोधात हिंसाचार करण्याऐवजी अहिंसक चळवळ उभारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये निदर्शकांनी भाजपने त्यांच्या घरांवर हल्ले केले आहेत. त्यांना रोखण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी केली आहे. त्यावर जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन यांनी म्हटले आहे की, आम्हाला हिंसाचार मान्य नाही, पण युवकांच्या प्रश्नांकडे भाजपने लक्ष दिले पाहिजे. त्याऐवजी भाजप प्रशासनाला दोष देत आहे.