नागपूर : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ए. आय. १७१ (बोईंग ७८७ ड्रिमलायनर) हे प्रवासी विमान कोसळल्यानंतर सर्वत्र आग, धुराचे लोळ आणि आक्रोश पसरला होता. सुरुवातीचे काही तास तर काय चाललंय हे काहीच कळत नव्हते, असा अंगावर काटा आणणारा अनुभव मांडलाय नागपूरकर डॉ. सुशांत देशमुख यांनी.

डॉ. सुशांत हे सध्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या परिसरातल्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटशी संलग्न (जी.सी.आर.आय.) सुपर स्पेशालिटी विभागात कर्करोग शल्यक्रिया शाखेत पदव्युत्तच्या अंतीम वर्षाचे विद्यार्थी आहेत.

शुक्रवारी सायंकाळी नागपूरातून माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, डॉ. सुशांत देशमुख सांगत होते, ज्या क्षणी हे विमान परिसरातल्या पदवी वसतीगृहावर कोसळले त्या क्षणी मी ट्रॉमाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासत होतो. विभागाची वेळ संपल्यानंतर मी जवळच असलेल्या वसतीगृहातील खोलीवर जाणार होतो. त्याच वेळी सोबत शिकणाऱ्या एका मित्राने होस्टेलला आग लागल्याचे सांगितले. मी लगेच बाहेर आलो.

वसतीगृहातील खोलीवर जाऊन महत्त्वाची कागदपत्रे वाचवू या विचारात होस्टेलकडे निघालो. बाहेर येऊन पाहतो तर समोर फक्त धुराचे लोळ दिसत होते. किंकाळ्या कानी पडत होत्या. काही कळतच नव्हते. पदवी वसतीगृहाला लागूनच आमचे पदव्युत्तर वसतीगृह आहे. मात्र जिथे विमान कोसळले त्यानंतर आगीने इतके रौद्र रुप धारण केले, की त्यामुळे आमच्या वसतीगृहाच्या इमारततही आग भडकली. ती आग पाहून इमारत कोसळते की काय अशी परिस्थिती होती.

पदवीचे ८ विद्यार्थीही दगावले

जिथे विमान कोसळले ती इमारत पदवी शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांचे वसतीगृह आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही जण वसतीगृहातल्या मेसमध्य जेवण करीत होते. आतापर्यंत आम्हाला 8 पदवी डॉक्टर या घटनेत दगावल्याची माहिती मिळत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य राबविल्याने मोठी जीवीतहानी टळली.

ज्युनिअरची आई आगीच्या भक्ष्यस्थानी

डॉ. सुशांत देशमुख सांगत होते, विमान कोसळ्यानंतर ज्या पदव्युत्तर वसतीगृहात आगीचा भडका उडाला तिथे माझ्या एका ज्युनिअरची आई मुलाला भेटण्यासाठी आली होती. ज्यावेळी हे विमान कोसळले त्यावेळी हा ज्युनिअरही शल्यक्रिया गृहात कर्तव्यावर होता. आगीनंतर जे डॉक्टर जीवाच्या आकांताने बाहेर निघत होते, ते सगळे तरुण आहेत. मात्र ज्युनिअरची आई ज्येष्ठ असल्याने त्या धावू अथवा उड्या मारू शकल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांचा मृतदेह दिसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

….तर वाढली असती जखमींची संख्या

ज्या इमारतीवर हे विमान कोसळले तेथून काही अंतररावर बाह्यरुग्ण विभाग आहे. मिलिट्री कॅम्पचा परिसरही जवळच आहे. मात्र हे विमान जर दुसरीकडे कोसळले असते तर कदाचित मृत्यू आणि जखमींचा आकडा वाढला असता. सुदैवाने तसे झाले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली, असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले.