scorecardresearch

अनाथ विद्यार्थिनी मुलाखतींपासून वंचित?; ‘एमपीएससी’च्या चुकीमुळे दोन्ही याद्यांमध्ये नावच नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुन्हा एकदा अपंग, अनाथ उमेदवारांवर अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

देवेश गोंडाणे

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुन्हा एकदा अपंग, अनाथ उमेदवारांवर अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२० च्या मुख्य परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तालिकेनुसार २१८ गुण मिळवणाऱ्या एका अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनीचे नाव पात्र आणि अपात्र अशा दोन्ही उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुख्य परीक्षा देऊनही आयोगाच्या गलथानपणामुळे तिला मुलाखतीपासून वंचित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात तक्रार करूनही आयोग दखल घेत नसल्याची खंत विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२० च्या मुख्य परीक्षेचा निकाल २५ मार्च २०२०ला जाहीर करण्यात आला. यामध्ये अनाथ प्रवर्गाचा ‘कट ऑप’ हा ९८ गुण इतका आहे. विविध प्रवर्गातील ‘कट ऑप’नुसार आयोगाने मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. तर अपात्र असणाऱ्या उमेदवारांची यादीही १ एप्रिलदरम्यान जाहीर केली. मात्र, संबंधित अनाथ विद्यार्थिनीचे नाव हे पात्र आणि अपात्र यादीतही नाही. आयोगाकडून मुख्य परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आल्यावर संबंधित विद्यार्थिनीने ती तपासली असता तिला २१८ गुण मिळणे अपेक्षित आहे. त्यात अनाथ प्रवर्गाचा कट ऑप हा ९८ असल्याने अनाथ प्रवर्गासह ही विद्यार्थिनी अन्य प्रवर्गातूनही पात्र ठरते. मात्र, आयोगाने तिचे नाव हे पात्र आणि अपात्र अशा दोन्ही गटात जाहीरच केलेले नाही. आयोगाने केलेल्या घोळामुळे विद्यार्थिनीची मुलाखतीची संधी हुकणार आहे.
ही बाब लक्षात आल्यावर विद्यार्थिनीने २ एप्रिलला आयोगाकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडून अद्यापही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे चुका आयोगाच्या आणि शिक्षा विद्यार्थ्यांना असा प्रकार सध्या सुरू आहे. यासदंर्भात आयोगाच्या सचिवांशी संपर्क साधला असता बोलण्यास नकार दिला.

याआधीही अपंग विद्यार्थ्यांवर अन्याय
आयोगातील काही अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे एका अपंग विद्यार्थ्यांवर संयुक्त परीक्षा गट- ब २०२० या परीक्षेत ‘कट ऑफ’पेक्षा अधिकचे गुण मिळूनही मुख्य परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली होती.

आयोगाकडून वारंवार अशा चुका होणे योग्य नाही. आयोगाने चुका करायच्या आणि विद्यार्थ्यांनी शिक्षा भोगायची हे कधीपर्यंत सुरू राहणार? – उमेश कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंट्स राईट असो.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orphaned student deprived interviews mistake mpsc maharashtra engineering service amy

ताज्या बातम्या