जिल्ह्य़ात डेंग्यूची साथ तीव्र

ज्या भागात रुग्ण अधिक आहेत तेथील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करा

आतापर्यंत ३७४ रुग्ण आढळले; बालकांचाही समावेश
नागपूर :  डेंग्यूची साथ जिल्ह्य़ात वाढत असून आतापर्यंत ३७४ रुग्ण आढळले आहेत. त्यात १६२ शहरातील आहे. यात बालकांचाही समावेश आहे. दरम्यान,  विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी साथ नियंत्रणासाठी महापालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना कराव्या, असे निर्देश दिले. तसेच उपाययोजनांचा दैनंदिन अहवाल सादर करण्यासंदर्भातही सूचनाही त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासोबतच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. डेंग्यू रुग्ण वाढत असल्याच्या  पार्श्वभूमी वर डेंग्यू डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी कोरडा दिवस पाळा, ज्या भागात रुग्ण अधिक आहेत तेथील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करा, ज्या घरामध्ये पाणी साचलेले आढळेल अशा घरांविरुद्ध दंडात्मक कारवाई करा, ग्रामीण भागात २१२ रुग्ण असल्यामुळे तालुकानिहाय विशेष अभियान राबवावे, असे निर्देशही यावेळी बैठकीत देण्यात आले.

बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. प्रकाश देव, टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भृशुंडी, डॉ. सरनाईक, इंदिरा गांधी महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता तसेच डॉ. अभिमन्यू निसवाडे, डागा रुग्णालय, एम्स तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रक्ताची गरज

डेंग्यूसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज  असून, जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिकेने रक्तदान शिबीर आयोजित करावे, सामाजिक संस्था तसेच युवकांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Outbreak of dengue in the district ssh