माहितीच्या अधिकारातील तपशील

आयकर विभागाने गेल्या तीन वर्षांत अनिवासी भारतीयांकडून (एनआरआय) एक कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.

माहिती अधिकार  कार्यकत्रे अभय कोलारकर यांनी आयकर विभागाकडे महितीच्या अधिकारात अनेक प्रश्नांची विचारणा केली होती. मात्र त्यापकी काही प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत. पहिल्या प्रश्नात कोलारकर यांनी अनिवासी भारतीयांनी २०१६ पासून ते २०१९ पर्यंत किती आयकर भरला, असा प्रश्न विचारला होता. यावर आयकर विभागाने २८.३४ कोटी आयकर प्राप्त झाल्याचे सांगितले.

वर्षनिहाय १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ मध्ये १५ लाख १५ हजार १९९  रुपये आयकर भरण्यात आला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ मध्ये २७ लाख ६७ हजार ८६८ रुपये प्राप्त झाले, तर १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ मध्ये ४६ लाख ६९  हजार ८२२ रुपयांचा आयकर प्राप्त झाला. तसेच गेल्या तीन वर्षांत काही अनिवासी भारतीयांनी उत्पन्नाच्या तुलनेत कमी कर भरल्याचे आयकर विभागाला दिसून आले. त्यामुळे विभागाने अशा ५२ अनिवासी भारतीयांकडून एकूण १ कोटी ७४ लाखाची थकबाकी वसूल केली आहे.

यामध्ये १ एप्रिल २०१६ ते ३१ एप्रिल २०१७ मध्ये १० अनिवासी भारतीयांकडून ७ लाख ७ हजार ६४८ रुपये, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत २२ अनिवासी भारतीयांकडून १२ लाख ८३२ हजार ४८६ रुपये तर १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान ९ लाख ७ हजार ५०१ रुपये विभागाने वसूल केले.