scorecardresearch

अन, बांबूच्या रांजीतून अवतरली वाघांची जोडी!, विदेशी पाहुण्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

व्याघ्रप्रकल्पात सहजासहजी वाघ दिसत नाही, पण सातासमुद्रापलीकडून पाहुणे आल्याने असेल कदाचित बांबूच्या रांजीतून वाघांची जोडी त्यांच्यासमोर आली. या व्याघ्रदर्शनाने पाहूणेही सुखावले.

foreign visitors fit tiger
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : जागतिक नकाशावर नाव कोरलेल्या भारतातील वाघांनी विदेशी पर्यटकांना भूरळ घातली. आता तेच विदेशी पाहुणे भारतात ‘सी-२०’च्या निमित्ताने आल्यानंतर व्याघ्रदर्शनासाठी ते पेंच व्याघ्रप्रकल्पात गेले. एरवी या व्याघ्रप्रकल्पात सहजासहजी वाघ दिसत नाही, पण सातासमुद्रापलीकडून पाहुणे आल्याने असेल कदाचित बांबूच्या रांजीतून वाघांची जोडी त्यांच्यासमोर आली. या व्याघ्रदर्शनाने पाहूणेही सुखावले.

‘सी-२०’ परिषदेच्या प्रतिनिधींसाठी आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत वाघोबांचे दर्शन घडले. एक नव्हे तर दोन वाघांसह इतरही वन्यप्राणी व पक्ष्यांचे वैविध्य पाहून विदेशी पाहुणे भारावले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी दखल घेतली. जी-२०चे मागील वर्षीचे आयोजक देश इंडोनेशियाचे सी-२० शेरपा अह माफ्तुचान, सी-२० ट्रायका सदस्य ब्राझिलच्या अलेसेंड्रा निलो, भारताचे सी-२० शेरपा विजय नांबियार यांच्यासह प्रतिनिधींनी बुधवारी सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पास भेट दिली.

हेही वाचा >>> यवतमाळ: बसचा भीषण अपघात; दोन प्रवासी ठार

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी या प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. स्वागतानंतर जंगल सफारीला सुरूवात झाली. येथील पानझडी जंगलात पेंच नदी, तोतलाडोह ओढा, पेपडी कुंड, हत्तीगोटा, राणीडोहमार्गे सुरु झालेल्या या प्रवासात अर्जुन, धावडा, तेंदू ,भेरिया, एन वृक्षांचे दर्शन घडत होते व या वृक्षांविषयी पर्यटक मार्गदर्शक माहिती देत होते. प्रवासात कोल्ह्यांची सुंदर जोडी, हरणांचे कळप, मोर, सांबर, रानकोंबड्या आदी प्राण्यांनी दर्शन दिले. ग्रे हॉर्नबिल, रूपर्ड ट्रिपॉय, रुडीसल डक, ब्लॅक स्टार्क आदी पक्षांचेही दर्शन घडले. येथील बांबूवनातून जातांना वाघाच्या जोडीचे दर्शन घडले. या दर्शनाने व्याघ्र प्रकल्पातील भेट यशस्वी झाल्याची भावना सी-२० च्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून आली. तोतलाडोहच्या बॅक वॉटर परिसरातून या जंगल सफरीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. जंगलातील प्राण्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बचाव मोहिमेची माहिती देण्यासाठी येथे स्टॉल्स उभरण्यात आले होते. या स्टॉल्सला भेट देवून प्रतिनिधींनी माहिती घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या