भंडारा : शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी आणि विशेषतः याच मार्गाने रात्रंदिवस सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावातील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली असून या जीवघेण्या रस्त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.

मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील मधुकर गाढवे यांच्या घरापासून ते रेती घाटपर्यंत हा पांदन रस्ता आहे. ग्रामस्थांना शेतशिवारात जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागते. मात्र सद्यस्थितीत या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोहाडी तालुक्यातील मोठा असा निलज बुज हा रेती घाट असून या घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. रेती घाटाकडे जाण्यायेण्यासाठी रेती तस्कर याच मार्गाचा वापर करतात. दिवस रात्र या मार्गावरून रेती तस्करांचा धुमाकूळ असतो. त्यामुळे आधीच खराब झालेल्या या पांदन रस्त्याची पाऊस पडल्यानंतर आणखीनच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतीकडे जाताना विशेषतः रात्रीच्या वेळी शेतावर मोटार पंप सुरू करण्यासाठी जाताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय याच रस्त्याच्या पलीकडे गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर, माता माय मंदिर, कबीर आश्रम तसेच स्मशानघाटसुद्धा आहे.

हेही वाचा – दहशतवादी अब्दुल कादीर पठाण तबलीग जमातचा कार्यकर्ता

हेही वाचा – संघटनात्मक वाढीसाठी राष्ट्रवादीचे सदस्य जोडो अभियान; ‘ईडी’ची भीती आणि सत्तेच्या लालसेने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांआधी मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ता योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गावकरी करीत आहेत. गुरुदेव भागवत बुधे यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी तहसीलदार दीपक करंडे यांना याबाबत पत्राद्वारे मागणी करून लवकरात लवकर हा पांदन रस्ता दुरुस्त करून देण्याची आणि रेती तस्करांनी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याची मागणी केली आहे.