जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने अखेर सुटका
जातीभेद नष्ट करण्यासाठी एकीकडे सरकार आंतरजातीय विवाहाला आर्थिक सहाय्य करून प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे समाजात प्रेमविवाहांना होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. उच्चशिक्षित आणि सज्ञान असलेल्या मुलामुलींनी केलेल्या प्रेमविवाहाला विरोध करण्यासाठी आईवडिलांनीच मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. मुलीचे प्रसंगावधान आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘ऑनर किलिंग’ची घटना टळली.
पराग हेमचंद्र दांडगे (३०) रा. वर्धा आणि डॉ. सुप्रिया काशीनाथ गोमासे (२७) रा. अकोला अशी या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. हल्ली हे जोडपे नागपुरात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहते. पराग हा वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत कामाला आहे. तर डॉ. सुप्रिया यांनी नाशिक येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून एबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. एका निसर्ग शिबिरादरम्यान २००७ साली त्यांची मेळघाट येथे पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०१३ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्धार केला. त्यासंदर्भात डॉ. सुप्रिया यांनी आपल्या आईवडिलांना माहिती दिली. परंतु जातीभेद आणि श्रीमंती-गरिबीच्या दरीमुळे डॉ. सुप्रिया आणि परागच्या लग्नाला विरोध त्यांनी केला. २०१३ मध्ये सुप्रिया ही नाशिक येथे इंटर्नशिप करीत होती. आईवडिलांचा लग्नाला विरोध असल्याने १३ ऑगस्ट २०१३ रोजी दोघांनीही नाशिकच्या पंचवटी आर्य समाज मंदिरात गुपचूप लग्न केले आणि वेगवेगळेच राहू लागले. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सुप्रिया अकोल्याला आईवडिलांकडे परतली. सर्वसंमतीने परागसोबत हिंदू पद्धतीनुसार लग्न करून देण्यासाठी अनेक दिवस तिने आईवडिलांची मनधरणी केली. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, आईवडील जबरदस्ती तिचा विवाह करून देण्याच्या तयारीत असताना २३ नोव्हेंबर २०१४ रोजी संधी साधून ती घराबाहेर पडली आणि परागच्या वर्धा येथील घरी पोहोचली, तेव्हापासून ते दोघेही सुखाने संसार करीत आहेत.
वर्धा येथे काही दिवस भविष्याचा विचार करून दोघेही नागपुरात राहायला आले. पराग हा वन्यप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थेच्या कामात गुंतला तर डॉ. सुप्रिया ही एका खासगी रुग्णालयात नोकरी करू लागली. दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू होता. त्यादरम्यान तिचे आईवडील तिला भ्रमणध्वनी करून परत येण्यासाठी आग्रह करीत होते, परंतु डॉ. सुप्रिया आपल्या निर्णयावर ठाम असल्याने ३१ ऑक्टोबर रोजी तिचे आईवडील काही गुंडांना घेऊन तिच्या घरी पोहोचले. त्यादिवशी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पराग घराबाहेर असताना आईवडिलांनी काही गुंडांच्या मदतीने तिचे अपहरण केले. यादरम्यान तिला प्रचंड मारहाण करण्यात आली आणि तिला घरात डांबून ठेवण्यात आले. कामावरून घरी परतल्यानंतर शेजारच्यांनी परागला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर परागने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. परंतु पोलिसांनीही परागच्या तक्रारीकडे कानाडोळा केला.
अकोला जिल्हाधिकाऱ्यांची मदत
पोलिसांकडून मदत मिळत नसल्याने परागने एका मित्राकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला. दरम्यान, डॉ. सुप्रियाने घरातून जुना मोबाईल मिळविला व परागला दूरध्वनी केला. त्यावेळी परागने डॉ. सुप्रियाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. तिने जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून जीव वाचविण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून अकोला पोलिसांना मुलीचे प्राण वाचविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अकोला पोलिसांनी तिला आईवडील आणि गुंडांच्या तावडीतून सोडविले.
जीवाला धोका होता -डॉ. सुप्रिया गोमासे-दांडगे
काही गुंडांच्या मदतीने आपल्या आईवडिलांनी आपले अपहरण केले होते. घरात डांबून आपल्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे आपल्या जीवाला धोका होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने माझी सुटका झाली असली तरी आरोपींवर कारवाई व्हायला पाहिजे. आरोपींमध्ये माझे आईवडील असतील तरी पोलिसांनी हयगय करायला नको, अशी प्रतिक्रिया डॉ. सुप्रिया गोमासे -दांडगे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पराग दांडगे यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार नोंदवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणाची साधी चौकशीही केली नाही. लोकांचे जीव धोक्यात असताना पोलीस निगरगट्ट बनून होते. अकोला पोलिसांनीही डॉ. सुप्रियावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे दांडगे यांनी हुडकेश्वर आणि अकोला येथील रामदासपेठ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.