राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पहिल्यांदाच अर्धवेळ पीएच.डी.साठी नियम तयार केले असून त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरदारांना साडेचार वर्षांत पीएच.डी.पूर्ण करून द्यायची आहे. यासंदर्भातील दिशानिर्देश विद्यापीठाने जारी केले आहेत.

पीएच.डी.मध्ये गुणवत्ता आणण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून नागपूर विद्यापीठात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय अनेक परंपरांना बाजूला सारून यूजीसीच्या नियमानुसार पीएच.डी. करण्यावर भर दिला जात आहेत. पूर्वी नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्य़ांच्या बाहेरचे, परप्रांतातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात पीएच.डी.साठी नोंदणी करीत असत. शिवाय त्यात मार्गदर्शक, संशोधनाचे केंद्र, कोर्स वर्क इत्यादी गोष्टींना फाटे दिले जात. एवढेच नव्हे तर नोकरदार एकाचवेळी नोकरी आणि पीएच.डी. करून लाभ मिळवत असे. यासंदर्भात विद्यापीठात नियम नव्हते. दोन्ही ठिकाणचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पहिल्यांदाच नियमांचे बंधन घालून देण्यात आले. ज्या नोकरदारांना पीएच.डी. करायची आहे त्यांनी पूर्णवेळ तीन वर्षांची रजा घेऊन ती पूर्ण करावी, असे ठरवले मात्र, काही नोकरदारांनी त्यावर आक्षेप घेतल्याने इतर विद्यापीठात असलेले अर्धवेळ पीएच.डी.चे नियम नागपूर विद्यापीठाने स्वीकारून नवे नियम तयार केले. त्याचे दिशानिर्देश नुकतेच जारी करण्यात आल्याचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

पीएच.डी. करण्यास शेकडो विद्यार्थी उत्सुक असतात. नागपूर विद्यापीठात २०१५पासून यूजीसीच्या नियमानुसार पीएच.डी. प्रवेश परीक्षेस (पेट) सुरुवात झाली. त्यात दोन परीक्षा घेतल्या जातात. वस्तुनिष्ठ (पेट-१) आणि दुसरी वर्णनात्मक (पेट-२) स्वरूपाची. दोनदा परीक्षा घेणारे हे एकमेव विद्यापीठ आहे.

सामान्यत: पूर्ण वेळ पीएच.डी. करणाऱ्यांना तीन वर्षांनंतर प्रबंध सादर करायचा आहे आणि रोज सहा संशोधन केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. मात्र अर्धवेळ पीएच.डी. धारकांना साडेचार वर्षांत पीएच.डी. पूर्ण करायची आहे. तसेच ५०० तास संशोधन केंद्रावर मार्गदर्शकाबरोबर त्याचे असणे अनिवार्य आहे. पीएच.डी.बाबत सामान्य उमेदवारांसाठी असलेले सर्व नियम अर्धवेळसाठीही आहेत. गुणवत्ता कायम रहावी म्हणून संशोधन केंद्रावरील तास आणि पीएच.डी.चा कालावधी वाढवण्यात आला आहे.

– डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ