अमरावती : गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेली अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. गेल्या २२ ऑगस्टपासून ही सेवा बंद होती. चार विमान उड्डाणे रद्द करण्यासंदर्भात अलायन्स एअर कंपनीने विमानतळ व्यवस्थापनाला कळवले होते. विमानतळाच्या लोकार्पणापासून आतापर्यंत अनेकवेळा अचानकपणे विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

१६ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले आणि गेल्या अनेक वर्षांची अमरावतीकरांची प्रतीक्षा पूर्ण झाली. आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरू झाली. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ७२ आसनी विमान मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावते. पण, गेल्या चार महिन्यात अनेक वेळा विमान उड्डाण रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी प्रतिकूल हवामानामुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. २२, २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी विमानसेवा बंद राहील, अशी माहिती अलायन्स एअर कंपनीने विमानतळ व्यवस्थापनाला दिली होती. उड्डाणे रद्द करण्यामागे ऑपरेशनल समस्या कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.

अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर १ सप्टेंबर पासून विमानसेवा सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. २९ ऑगस्टला सकाळपर्यंत या तारखेच्या ३ हजार १५० रुपये किमतीच्या दोन जागा शिल्लक असल्याचे दिसून आले. अमरावतीत-मुंबई विमानसेवेला गेल्या चार महिन्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरासरी ५० ते ६० प्रवासी या विमानसेवेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. तरीही विमान कंपनी ही दीव आणि हैदराबाद विमानसेवेला प्राधान्य देत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अलायन्स एअरची फ्लाइट प्रथम मुंबईहून दीव किंवा हैदराबादला जाते आणि नंतर दुपारी ती मुंबईला परत येते आणि अमरावतीला जाते. त्यानंतर, अमरावतीला पोहोचल्यानंतर, तिला परत मुंबईला विमान घ्यावे लागते. अशा परिस्थितीत, हवामान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणामुळे उड्डाणाला उशीर झाल्यास, अमरावतीमध्ये रात्रीच्या लँडिंगची सुविधा नसल्याने त्या दिवसाची फ्लाइट रद्द केली जाते. हे यापूर्वीही अनेकदा घडले आहे.

विमानसेवेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. अमरावती-मुंबई विमानसेवा सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न करावेत. ही सेवा बंद पडू नये, याची खबरदारी घ्यायला हवी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.